तरुणाईचे समाजमाध्यमांवर "सोशल वॉर' 

तरुणाईचे समाजमाध्यमांवर "सोशल वॉर' 
Updated on

ठाणे : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायद्याच्या अंमलबजावणीला विविध राज्यांतून विरोध होत आहे. या आंदोलनाची सर्वाधिक झळ उत्तर प्रदेशला बसली असून येथील हिंसाचारात काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक पोलिसही जखमी झाले आहेत. समाजमाध्यमावरही या कायद्याला अनुसरून "सोशल वॉर' सुरू असल्याचे चित्र आहे.

तरुणांचा यात मोठा सहभाग असून कायद्याचे समर्थक "भारत सरकारने कोणतीही कागदपत्रे मागितल्यास, आम्ही दाखविण्यास तयार आहोत', असे सांगून "हॅशटॅग' वापरून तो संदेश व्हायरल करीत आहेत; तर दुसरीकडे कायद्याचे विरोधक "हम कागज नही दिखाएंगे', या "हॅशटॅग'खाली तीव्र मते समाजमाध्यमावर उमटवत आहेत.
 
महाराष्ट्रातही या आंदोलनाचे पडसाद उमटल्याचे चित्र गुरुवारी (ता. 19) ऑगस्ट क्रांती मैदानात दिसून आले. ठाण्यात काही संस्थांनी मोर्चा काढत या कायद्याला समर्थन दर्शवले. सीएए आणि एनआरसी कायद्याला काही स्तरांतून विरोध; तर काही स्तरांतून समर्थन मिळत असल्याचे चित्र राज्यातील विविध भागात दिसत आहे.

या आंदोलनात समाजमाध्यमाचीही मोठी भूमिका दिसून येत आहे. समाजमाध्यमावर या आंदोलनाविषयी व्हायरल होणारे संदेश, व्हिडीओ याविषयीचीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. व्हॉट्‌सऍप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यावर नागरिक आपली मते उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत. 

कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या हिंसाचाराची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर काही नागरिकांनी ही चित्रे त्रासदायक, मन विषण्ण करणारी असल्याची भावना व्यक्त केली. पोलिस आपणास सुरक्षित ठेवण्यासाठीच त्यांचे कर्तव्य बजावित आहेत. पोलिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांवर हल्ला ही नेहमीच निषेधार्ह बाब आहे असे सांगत, निषेध करणाऱ्यांना आवाहन करीत, निषेध करणे हा तुमचा अधिकार आहे; परंतु शांततेत निषेध करा.

भारतातील लोक तुमच्या पाठीशी आहेत. हातात कायदा घेणे निरर्थक आहे. अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करून लोकशाही मार्गाने "सीएए' आणि "एनआरसी'ला विरोध करा, असा सल्ला दिला जात आहे. काही व्यक्ती आधी कायदा काय आहे ते जाणून घ्या आणि मगच निषेध करा, इतर राज्यांत अहिंसात्मक घटना घडत आहेत, म्हणून आपणही विरोध करणे चुकीचे असल्याचे सांगत आहेत. 

हम कागज नही दिखाएंगे... 
यु ट्यूबवर गीतकार वरुण गोव्हर यांचा "हम कागज नहीं दिखाएंगे' व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एनआरसी कायद्याला विरोध करताना ते म्हणतात "तानाशाह आके जाएंगे, हम कागज नहीं दिखाएंगे. तुम आंसू गैस उछालोगे, तुम जहर की चाय उबालोगे, हम प्यार की शक्कर घोल के उसको, गट गट गट पी जाएंगे, हम कागज नहीं दिखाएंगे' या कवितेच्या ओळी व्हायरल करत "हम कागज नही दिखाएंगे' या स्लोगनखाली अनेक नागरिक एनआरसी कायद्याला विरोध करताना दिसत आहेत. परंतु काही नागरिकांनी या व्हिडीओला विरोध केल्याचेही दिसून येत आहे. 

समर्थनार्थ ट्‌विटरवर ट्रेंड 
ट्विटरवर, इन्स्टाग्राम यावर #indiastandwithnrc ही कायद्याला समर्थन करणारी मोहीम चालविली जात आहे. हा हॅशटॅग वापरून मी, ............. गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की- NRC कायदा लागू झाल्यानंतर माझे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी भारत सरकारने जर काही कागदपत्रे मागितली, तर मी आनंदाने देईल...! रांगेत उभं रहावं लागलं तरीही... आणि घरी आल्यानंतर सेल्फीसुद्धा टाकेन...! अशा आशयाचा मजकूर व्हायरल करत कायद्याचे समर्थन केले जात आहे. सीएए-एनआरसी सपोर्ट, हम मोदी जी के साथ है हा ट्रेण्ड ट्‌विटरवर सुरू आहेत. 

फेसबुकवर जॉईंन्ड फोरम अगेन्स्ट एनआरसी, देश मे एनआरसी लागू, आय सपोर्ट एनआरसी असे ग्रुप पेज तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपचे हजारोंनी मेंबर असून यावरही अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया उमटविल्या आहेत. कायद्याला समर्थन करणाऱ्या गटातून या ग्रुपमध्ये राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाला समर्थन करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्याविषयी आवाहन करण्यात आल्याचे दिसून येते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.