पालघर : पालघर (palghar) जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे (electricity) नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात काही भागात पाण्याचा प्रश्नही (water problem) जटिल आहे. एकूणच विविध समस्यांनी येथील नागरिक रोजगारासाठी (employment) स्थलांतरित होतात; परंतु जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती (solar energy) करून त्याद्वारे शेतीचे नंदनवन फुलवण्यात ‘दिगंत स्वराज फाऊंडेशन’ने (Digant swaraj foundation) पुढाकार घेतल्याने येथील स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे. आता हाच कित्ता इतर तालुक्यांनीही गिरवल्यास पालघर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने उन्नतीचा मार्ग मिळणार आहे.
अतिदुर्गम भागात असणाऱ्या गावांना पिण्यासाठी व शेती करण्यासाठी पाणी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डिसेंबर ते जूनच्या मध्यापर्यंत येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. नागरिकांना वेळप्रसंगी दूषित पाणीही प्यावे लागते. पाण्याअभावी शेती होत नसल्याने रोजगारानिमित्त येथील नागरिकांना नाशिक, ठाणे किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत आहे. गैरसोयींचा हा पाढा जाणून घेतल्यानंतर आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन मिळावे, पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून दिगंत स्वराज फाऊंडेशनचे संस्थापक संचालक राहुल तिवरेकर यांच्या नेतृत्वाखाली ३० सदस्यांनी एकत्र येत मोखाडा तालुक्यात ३ वर्षांपूर्वी कामाचा श्रीगणेशा केला. पाण्याचे स्रोत शोधून सौरऊर्जेने ही समस्या निकाली काढली आहे.
तालुक्यातील उंचावर असणाऱ्या गावांना सौरऊर्जा प्रकल्प लावण्यात आले. त्यासाठी सौरपंपाची जमवाजमव केली. पायथ्याशी असणारे पाणी टाकीत जमा करण्यासाठी एका गावात पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसवल्यानंतर गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळू लागले आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियावरून मागवलेले फिल्टर या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या सुटल्याने ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे. पाणीप्रश्न सुटल्याने रोजगारानिमित्त स्थलांतरित होणारा येथील तरुणवर्गही आता शेतीकडे वळला आहे.
साठवलेल्या पाण्याचा उपयोग आता पावसाळ्यानंतरदेखील शेतीसाठी होऊ लागला आणि हळूहळू शेतीत नंदनवन फुलले.
मोगरा, भुईमूग, मिरची, वांगी, घेवडा, भेंडी यासह अन्य पालेभाज्यांची लागवड येथील आदिवासी बांधव करीत आहेत. येथे फळबागादेखील फुलवल्या जात आहेत. एकूण एक हजार एकर क्षेत्रात शेती करून विविध उत्पादने घेतली जात आहेत. प्रगत शेती कशी करावी, यासाठी दिगंत फाऊंडेशन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहे; तर फळबागा लागवडीसाठी एका शेतकऱ्याला ५० झाडे-रोपांची व बियाणे वितरित केली जातात. यातून त्यांना उत्पन्न मिळत असल्याने स्थलांतरित होणारे ग्रामस्थ आता गावातच राहून उत्पादन घेत आहेत.
त्यातच गावातील शाळा, अंगणवाडी व पथदिवे देखील सौरऊर्जेवर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे विजेची बचत तर होतेच, मात्र वीज खंडित होण्याचा प्रश्न देखील उद्भवत नाही. पालघर जिल्ह्यात दुर्गम, अतिदुर्गम भागात अनेक ठिकाणी पाणीसाठे उपलब्ध आहेत. जर सोलारचा वापर केला गेला, तर या पाण्याच्या स्रोतातून शेतीला नवा मार्ग मिळेल व जीवनमान उंचावून, आदिवासीबहुल भागाचा विकास साधणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.