BLOG - भगतसिंग कम्युनिस्ट होते का ?.

BLOG - भगतसिंग कम्युनिस्ट होते का ?.
Updated on

23 मार्च 1931 च्या रात्री शहिदे आझम भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. आज त्यांची 89 वी पुण्यतिथी आहे. शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचा वैचारिक कल कोणत्या विचारधारेकडे होता हा इतिहासाला पडलेला  एक मोठा प्रश्न आहे . गेल्या काही दशकांपासून अनेक राजकीय पक्षांनी महापुरुष आपापसांत वाटून घेतलेत. काही पक्ष भगतसिंग यांना कम्युनिस्ट म्हणून आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे प्रवर्तक म्हणून गेल्या काही दशकांमधून चित्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वास्तविक इतिहासाला  आणखी काही सांगायचे आहे. आज लाल झेंड्यामागे भगतसिंगांचा फोटो काही ठिकाणी दिसतोय. त्यानिमित्त खरेच भगतसिंग कम्युनिस्ट होते का याकडे पाहू -

१) भगतसिंग भारतीय कम्युनिस्ट पार्टीमध्ये कधीच सामील झाले नाहीत. जर लोक म्हणतात की ते कट्टर कम्युनिस्ट होते, तर ते कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या किंवा सुरुवातीच्या टप्प्यात सामील होऊ शकले असते. जो पक्ष १९२५ मध्ये त्यांच्या समोर स्थापन झाला असता.  जसे माओ हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य होते. तसे भगतसिंगांना करता आले असते.  माओ म्हणाला होता की कम्युनिस्ट चीनचा मी पहिला पंतप्रधान होईल तसे भगतसिंग पण जाहीर करू शकले असते. परंतू त्यांनी असे काही बोलले नाही किंवा विचार केला नाही.

२) दिल्लीत असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकल्यानंतर भगतसिंगांना तुम्ही कोण म्हणून विचारले असता, त्यांचे वकील असफ अली यांच्यामार्फत ते म्हणाले की “आम्ही नम्रपणे, केवळ इतिहासाचे गंभीर विद्यार्थी असल्याचा दावा करतो…” आणि त्यांनी लिहिलेल्या तरुण राजकीय कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात ," मी अतिरेकी नाही, मी  क्रांतिकारक आहे, ज्याला येथे चर्चा झालेल्या लांबलचक कार्यक्रमाच्या निश्चित कल्पना आल्या आहेत.” हे सर्वज्ञात आहे की तत्कालीन  भारतात फार कमी लोक होते ज्यांनी भगतसिंगांप्रमाणे मार्क्सवादाचा अभ्यास केला होता, परंतु तरीही त्यांनी कम्युनिस्ट असल्याचा दावा कधीच केला नाही.

3) असे म्हटले जाते की तुम्ही मार्क्सशी सहमत होऊ शकता किंवा तुम्ही  मार्क्सशी असहमत होऊ शकता परंतु तुम्ही मार्क्सकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून भक्तीसिंगांनी मार्क्सवादी विचारधारेचा अभ्यास केला आणि त्याचे विश्लेषण केले. आणि त्यातून भारतीय परिस्थितीला योग्य रास्त असणाऱ्या गोष्टी स्वतःच्या विचारधारेत सामील केल्या. भारतीय कम्युनिस्ट पार्टीप्रमाणे भगतसिंगाने कधीही  युएसएसआरकडून आदेश घेतले नाहीत. तो आणि त्याचे साथीदार त्यांच्या विवेकबुद्धीने वागले. ज्यामुळे त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए)ची स्थापना केली, भविष्यातील घटना आणि प्रोग्राम बनविला.

४) भगतसिंगांनी त्यांच्या तुरुंगातील डायरीत पान क्र. १०२ वर "व्लादिमीर सिखोविच" या पुस्तकातून मार्क्सवाद आणि समाजवाद यांच्यातील फरक नोंदवून घेतला आहे. येथे मार्क्सच्या सिद्धांतांवर जोरदार टीका केली जाते. भगतसिंगांनी आपल्या समाजवादी भूमिकेचा पुनरुच्चार अनेक जागी केला आहे जो मार्क्स आणि इतर तत्वज्ञांच्या शिकण्यावर आधारित होता. त्याच्या तुरूंगातील डायरीमध्ये लेनिन, मार्क्स, हेगेल, टागोर, गांधी, बिपिन चंद्र पाल, बर्ट्रेंड रसेल, प्लेटो, रोसुआ, डोस्टोव्स्की, जॅक लंडन, बायबल इत्यादींचे लेखन सापडते. जर आपण लेखन तपशीलात वाचले तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. भगतसिंग प्रत्यक्षात सर्व प्रकारच्या अन्यायांपासून मानवी मुक्तीच्या अंतिम विचारसरणीच्या शोधात होते. तो असा माणूस होता जो प्रत्येक विचारसरणी अभ्यासून,  पडताळून त्यांची भारतीय परिस्थिती अनुरूप सूक्ष्म चाचणी घेऊन आत्मसात करीत असे.

५) भगतसिंग यांनी समाजवाद हा एक उत्तम तत्वज्ञान म्हणून मानले आणि आपल्या कार्यक्रमात समाविष्ट केले, त्यावेळी सुभाष बोस आणि जवाहरलाल हेदेखील समाजवादावर विश्वास ठेवणारे नेते होते परंतू प्रत्येकाचा समाजवाद हा स्वतंत्र आहे.

६) होय, हे खरे आहे की भगतसिंग यांना रशियन राज्यक्रांतीबद्दल फार आकर्षण होते आणि त्यांनी लेनिनच्या अनेक कल्पनांचा अवलंब केला. पण जवाहरलाल हे देखील रशियन क्रांतीचेही मोठे प्रशंसक होते, त्यांनी अगदी रशियाला जाऊन आल्यावर भारतीय शेतकरी संघटित करण्याचा प्रयत्न केला . स्वातंत्र्यानंतर त्यांनी रशियाकडूनच पंचवार्षिक योजनांची नक्कल केली, पण नेहरूंना कम्युनिस्ट म्हणण्याची हिम्मत कोणी करते का? तर नाही !!

७) कम्युनिस्ट पक्षाच्या १ नोव्हेंबर १९३० च्या अंकात भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांच्या कामाचा निषेध केला आहे. कामगारांच्या साप्ताहिकात भगतसिंगाचा विशेष उल्लेख करून वैयक्तिक दहशतवादाचे धोरण म्हणजे क्रांती नव्हे  असे प्रतिपादन केले आहे. डिसेंबर १९५१ पर्यंत, सीपीआय पक्ष भारतीय  क्रांतिकारकांना सरळसरळ दहशतवादी म्हणून जाहीर करतो आणि त्यांनी मार्क्सवादाशी  प्रतिकूल आणि अप्रिय म्हणून त्यांच्या पद्धतींचा निषेध केला.
विचार करा, जर त्यावेळच्या कम्युनिस्टांनी भगतसिंग गैर-मार्क्सवादी, गैर कम्युनिस्ट  म्हणून त्यांचा  निषेध केला असेल तर भगतसिंग यांचं  पेटंट घेऊ पाहणारे हे आजचे कम्युनिस्ट कोण आहेत?

८) भगतसिंगांना अशी समाजवादी क्रांती हवी होती ज्यात पहिले पाऊल ही राजकीय क्रांती आहे. कम्युनिस्ट म्हणतात की भगतसिंग लेनिनचे उदाहरण देतात, होय ते नक्की देतात , पण लेनिन बरोबर त्यांनी टिळकांचेही उदाहरण दिले, ते म्हणाले, “टिळकांचे धोरण सर्वात चांगले होते, तडजोडीचे धोरण. आपण शत्रूंकडून 16 आणे  मिळविण्यासाठी लढा देत आहात, आपल्याला फक्त एक आना मिळेल, तो खिशात घाला आणि उर्वरित लढा द्या.” साहजिकच आपण गांधीजींच्या पद्धतींमध्ये हेच धोरण पाहू शकतो. 

९) भगतसिंगांनी  तरुण राजकीय कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात काही ढोंगी कम्युनिस्टांची अशी टीका केली आहे. "कामगार चळवळीतील काही महामूर्ख लोक आहेत, ज्यांना  असे वाटते की, राजकीय स्वातंत्र्य नसताना शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे . या गोष्टी अशक्य आहेत. आमचे क्रांतिकारकांचे आर्थिक क्रांती हेच ध्येय आहे परंतु हे राजकीय क्रांतीशिवाय अशक्य आहे.  सुरुवातीच्या काळात कामगार वर्गांच्या छोट्याशा आर्थिक मागण्यांसाठी आणि विशेषाधिकारांसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, परंतु राजकीय सत्तेवर विजय मिळवण्याच्या अंतिम संघर्षासाठी शिक्षण देण्याचे हे सर्वोत्तम मार्ग आहेत. ”

१०) १९७२ मध्ये बिपन चंद्र यांनी असे मत व्यक्त केले की "भगतसिंग आणि त्याचे मित्र मार्क्सवादाचे महान अभ्यासक नव्हते पण ते अगदी नवशिके पण नव्हते. भारतीय क्रांतीच्या समस्यांविषयी वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवून ते सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि विचार करत होते.”  त्याच वेळी, बिपनचंद्र यांनी कबूल केले की, “त्यांच्या समाजवादी विचारसरणी आणि  कार्य यांच्यात अनेक विरोधाभास आहे परंतु  त्यांनी फक्त एक राष्ट्रवादी चेतना जागृत करण्याचे काम जरूर केले. ”

अनेक अभ्यासकांच्या मते भगतसिंगांची विचारधारा ठरवणे अशक्य आहे . अगदी नावच द्यायचं झालं तर ते " socialist democrat " म्हणजे समाजवादी लोकशाही मानणारे होते असं म्हणले तर वावगे ठरणार नाही . 

नोट - वरील लेखातील विचार हे लेखकाचे वैय्य्कतीक विचार आहेत

लेखक -  अभिजीत भालेराव, इतिहास संशोधक आणि अनुवादक - शहीद भगतसिंगांची जेल डायरी 

ab1bhalerao@gmail.com (09969298076)

References –
Without fear – Kuldeep Nayar.
Trial of Justice – A.G.Noorani .
Bhagat singh and his selected writings (NBT) 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.