नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू करा, माथेरान नगराध्यक्षांची मागणी

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू करा, माथेरान नगराध्यक्षांची मागणी
Updated on

मुंबईः  माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणारे पर्यटक यांना नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे माथेरानला पुन्हा पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी शटल सेवेच्या फेऱ्या वाढविण्याची आणि माथेरान तसेच अमन लॉज रेल्वे स्थानकातील स्वच्छता विषयक कामे तसेच रंगरंगोटी करण्याची मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस मित्तल यांना माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केली आहे.

माथेरान हे मुंबई पासून सर्वात जवळ असलेले पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळावर येणाऱ्या सर्व पर्यटकांचे आकर्षण म्हणून मिनी ट्रेनकडे पाहिले जाते.100 वर्षांपासून मिनी ट्रेन आणि माथेरान हे नाते निर्माण झाले असून परदेशी पर्यटक हे गेल्या काही वर्षात मिनिट्रेनची सेवा मिळत नसल्याने कमी झाले आहेत. परदेशी पर्यटक पूर्वी कोणत्याही हंगामात माथेरानमध्ये दिसून यायचे. त्याला कारण नेरळ-माथेरान-नेरळ अशी मिनीट्रेनची सेवा असल्याचे माथेरान मधील व्यापारी यांचे मत बनले आहे.

गेल्या काही वर्षात नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या सेवेकडे मध्य रेल्वेच्या प्रशासनाने केलेले दुर्लक्ष यामुळे खास मिनी ट्रेनसाठी येणारे पर्यटक यांची संख्या कमी झाली आहे. 2018 मध्ये किरकोळ अपघातानंतर एप्रिल महिन्यात मिनी ट्रेन बंद करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण पर्यटन हंगाम कोमेजून गेला होता. त्यात नेरळ-माथेरान -नेरळ सेवा सुरू असताना ऑनलाइन नोंदणी करून तिकीट बुक करण्याचे धोरण या मार्गावर मध्य रेल्वेने बंद करून केवळ तिकीट खिडकीवर तिकिटे मिळत असल्याने त्याचा परिणाम देखील बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातून येणाऱ्या पर्यटकांवर झाला आहे. इंटरनेटवर मिनीट्रेनची बुकिंग होत नसल्याने खास मिनीट्रेन मधून प्रवास करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना बंद असल्याचा मेसेज जात आहे. त्यामुळे माथेरानचे पर्यटन लॉकडाऊननंतर पुन्हा फुलवायचे असल्यास मिनीट्रेनची नेरळ- माथेरान-नेरळ सेवा सुरू करणे ही काळाची गरज आहे.

त्या दृष्टीने आता माथेरान गिरीस्थान नगरपरिषद नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस मित्तल यांना पत्र पाठवून मिनीट्रेनची थेट सेवा आणि शटल फेऱ्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. पूर्वी नेरळ-माथेरान-नेरळ अशी सेवा सुरू असताना दिवसात किमान पाच आणि कमाल सहा गाड्या देखील या मार्गावर चालविल्या गेल्या आहेत. याची आठवण देखील नगराध्यक्ष सावंत यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना करून दिली आहे.

मध्य रेल्वेकडून पर्यटन वाढीसाठी स्वच्छतेची कामे हाती घेण्याची मागणी करण्यात आली असून माथेरान आणि अमन लॉज या स्थानकात रंगरंगोटी तसेच सुशोभीकरण ही कामे देखील करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमन लॉज स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची आणि तेथे असलेले वेटिंग रूम पर्यटकांना गाडी येईपर्यंत बसण्यासाठी खुले करण्याची मागणी केली आहे.

मिनिट्रेनच्या शटल सेवेची माहिती माथेरान मध्ये आलेल्या पर्यटकांना आणि प्रवाशांना व्हावी यासाठी इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर माथेरान तसेच अमन लॉज आणि दस्तुरी नाका येथे मध्य रेल्वेकडून बसविण्यात यावेत अशी मागणी देखील आपल्या पत्रात केली आहे. त्याचवेळी माथेरान स्थानकातील पिट मार्गाचे काम देखील पूर्ण करण्याचे आणि नियोजित म्युझियमचे काम मार्गी लावण्याचे आवाहन देखील नगराध्यक्ष सावंत यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांना पाठवलेल्या पत्रात केले आहे.

नगराध्यक्ष सावंत यांच्या पाठपुराव्याला यश शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ

माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटन हंगाम झाला नव्हता आणि आता लॉकडाऊननंतर दिवाळी हा पहिला हंगाम सुरू झाला आहे. 4नोव्हेंबर रोजी शटल सेवा सुरू झाल्यानंतर मिनीट्रेनच्या केवळ दोन फेऱ्या अमन लॉज-माथेरान दरम्यान सुरू होत्या. त्यात 14 नोव्हेंबर पासून वाढ करण्यात आली असून आता दररोज चार फेऱ्या होणार आहेत. त्यात माथेरान येथून चार तर अमन लॉज येथून सहा डब्यांची मिनीट्रेन चार वेळा माथेरान शहरात पोहचणार आहे.

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Start Neral Matheran mini train service demand of Matheran mayor

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.