मुंबई: लाॅकडाऊन उठवल्यानंतर मुंबईत दररोज नव्याने अडीच ते तीन हजाराच्या संख्येत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात दररोज 20 हजारां पेक्षा केसेसची नोंद झाल्यानंतर राज्यात गेल्या दहा दिवसांत रुग्णांमध्ये घट झाली आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नवीव रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे.
अनलॉक सुरु झाल्यापासून मुंबईतील व्यवहार सुरळीत होत आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीत सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क घालून प्रवास करण्याबाबतच्या नियमांना मुंबईकरांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे, कोव्हिडचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, तरीसुद्धा कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या सुविधा वाढलेली रूग्णसंख्या हाताळण्यासाठी सक्षम असल्याचे मत टास्क फोर्सने व्यक्त केले आहे. सध्या मुंबईत 24 हजार सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या 30 ते 35 हजारांपर्यंत गेली तरी पालिकेने केलेल्या सुविधा हे आव्हान सहज पेलू शकते, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले आहे.
केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि राज्य समितीचे सदस्य व मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डाॅ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नवीन रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. सध्या लक्षणरहित किंवा सौम्य लक्षणे असणार्यांची संख्या अधिक आहे. मात्र, मृत्यू दर आणि गंभीर रुग्णांची संख्या स्थिर आहे. होम क्वारंटाईन आणि जम्बो कोव्हिड केंद्रांचा वापर करून आपण नक्कीच सक्षम राहू शकतो. सक्रीय रुग्णांची संख्या 30 ते 35 हजारांपर्यंत गेली तरी आपण ही रुग्ण संख्या हाताळू शकतो. सध्या 24 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे आणखी 5 ते 10 हजार रुग्ण वाढले तरी परिस्थिती हाताळणे सोपे होईल. त्यावर जर रुग्णांची संख्या गेली तर नव्याने रुग्णालये, सुविधा उभारावी लागेल.
गणेशोत्सवानंतर मुंबई किंवा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढेल हे सर्वांनाच माहित होते. त्यानुसार, पालिका आणि राज्य सरकारने अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. सध्या वाहतुकीची सुविधा देखील सुरू झाल्याकारणाने कोरोना रुग्णांची संख्या वाढेल हे निश्चित होते. लोकल सुरु करणे गरजेचे आहेच पण, निर्बंध घालूनच प्रवास करता येईल का याकडे लक्ष दिले पाहिजे. लोकलच्या फेऱ्या वाढवून जास्त गर्दी होणार नाही, याची काळजी घेऊनच लोकल सर्व सामान्यांसाठी सुरू करावी. तसेच त्यात गर्दी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी किंवा गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लावावी लागेल. अन्यथा आता पेक्षा अधिक पटीने रुग्णांची संख्या वाढेल. त्यासाठी मनुष्यबळाची ही खूप गरज भासेल. त्यामुळे, निर्बंध घालूनच प्रवास करण्याची मुभा द्यावी लागेल.
लसीसाठी फेब्रुवारी 2021 उजाडेल!
रुग्णांची संख्या येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, लस येण्यासही 2021 फेब्रुवारी उजाडेल. लस आली तरी ती सर्वांना मिळेपर्यंत त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार व्हायला किमान दोन महिने लागतील. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला फेब्रुवारी 2021 उजाडेल असेही डाॅ. सुपे यांनी स्पष्ट केले आहे. कोव्हिडचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतलीच पाहिजे. मुंबईत सध्या दर दिवशी 2 ते 3 हजार रुग्णांची नोंद होत आहे. ती संख्या 4 हजारांपर्यंत जाऊन मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार नक्कीच पार होऊ शकते असाही अंदाज डाॅ. सुपे यांनी व्यक्त केला आहे.
न्यू नाॅर्मल पद्धती अवलंबली पाहिजे!
मुंबई जसजशी अनलॉक होईल तसे रुग्ण वाढतील हे सत्य आहे. त्याचबरोबर जर चाचण्या आणखी वाढवल्या तर रूग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे लवकर निदान होऊन त्यांच्यावर लवकर उपचार होतील. मात्र, आता लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि स्वच्छता ही त्रिसूत्री स्वीकारली पाहिजे आणि ते पाळूनच अनलॉक होणे गरजेचे आहे. घरी बसून राहिलो तर अर्थचक्र थांबेल आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम होईल. त्यामुळे, लोकांनी आता न्यू नाॅर्मल पद्धती अवलंबली पाहिजे, असे कोरोना विशेष कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
----
संपादन ः ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.