तुर्भे : नवी मुंबई शहरात भटक्या कुत्र्यांची (stray dogs) दहशत वाढली आहे. शहरात पालिका रुग्णालयात (bmc hospitals) वर्षाला तब्बल १० ते १३ हजार श्वानदंशांचे रुग्ण (dog bite patients) दाखल होत असल्याची माहिती समोर येत आहे; तर गेल्या १३ वर्षांत शहरात सुमारे एक लाख ५९ हजार १३६ नागरिकांना चावा घेतल्याची नोंद महापालिकेकडे (Navi Mumbai municipal) झाली असून अशा रुग्णांना एआरव्ही लस (ARV Vaccines) देण्यात आली आहे.
शहरातील रस्ते, कचराकुंड्या, सिडको वसाहती, झोपडपट्टी आदी भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. कुत्र्यांची नसबंदी करून पुन्हा परिसरात सोडले जाते; मात्र तरीही कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये भटके कुत्रे मोकाट फिरत असतात.पालिकेतर्फे श्वानांना अॅन्टीरेबीज लस दिली जाते. ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत पालिका क्षेत्रातील कुत्र्यांवर निर्बीजीकरण केले जाते. त्यांना रेबीजची लसही दिली जाते; मात्र श्वानदंश झालेल्या रुग्णांची वर्षभरातील संख्या पाहता महिन्याला किमान शे-दोनशे रुग्ण श्वानदंशासाठी उपचार घेण्यासाठी येत आहेत. ही संख्या चिंताजनक आहे.
गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेतला असता, नवी मुंबईतील वाशी येथील पालिका रुग्णालयात श्वानदंशाच्या रुग्णांची संख्या दीडशे-दोनशेने वाढली आहे. मात्र पालिका रुग्णालयात उपचारासाठी शहराबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या ४० ते ५० टक्के आहे. जखमी व रोगट श्वानांबाबत तक्रार निवारणासाठी २४ तास सेवा आणि रुग्णवाहिनी उपलब्ध असून, प्रशिक्षित मनुष्यबळ, दोन मोठी व एक लहान वाहने महापालिकेच्या श्वान नियंत्रण केंद्रात कार्यरत आहेत. शहरातील भटक्या श्वानांवर तुर्भे क्षेपण भूमीजवळील तात्पुरत्या श्वान नियंत्रण केंद्रात निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते.
नवी मुंबई पालिका रुग्णालयात पनवेल शहराचा ग्रामीण भाग, उरण आणि मानखुर्द, गोवंडीमधून येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. महापालिका क्षेत्रात गावठाण व झोपडपट्टी भागात कुत्र्यांची संख्या मोठी असून लहान मुलांबरोबरच मोठेही दहशतीखाली वावरताना दिसतात. कोपरखैरणेत काही वर्षांपूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात एक मुलगा गंभीर जखमी झाला होता. नवी मुंबई शहरात श्वान नियंत्रण कार्यक्रम खासगी संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो. श्वानांच्या लसीकरण आणि निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक श्वानामागे ५५० रुपये खर्च केला जातो. दर महिन्याला साधारण ६०० श्वानांचे लसीकरण आणि साधारण २५० श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते.
"नवी मुंबई महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. याशिवाय मोफत एआरव्ही इंजेक्शन आणि आवश्यक उपचार मोफत केले जातात. ज्या भागात कुत्र्यांची संख्या वाढली आहे, अशा ठिकाणचे कुत्रे पकडून लसीकरण व निर्बीजीकरण केले जाते."
- डॉ. श्रीराम पवार, पशु वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका
श्वानदंशाची एकूण संख्या
२००८-०९ :- ७,७१२
२००९-१० - ९,६७१
२०१०-११ - १०,९३५
२०११-१२ -१२,७७४
२०१२-१३ १३,४३५
२०१३-१४ १४,५६३
२०१४-१५ १३,९६०
२०१५-१६ १३,९२१
२०१६-१७ १४,५४६
२०१७-१८ १३,७८३
२०१८-१९ १२,२९५
२०१९-२० १०,४८२
२०२०-२१ ७,७७२
जानेवारी ते ऑगस्ट ३,२८७
एकूण - १,५९,१३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.