सुशांत मृत्यू प्रकरण: मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी १४ जूनपासून तब्बल ८० हजार फेक अकाऊंट्स

सुशांत मृत्यू प्रकरण: मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी १४ जूनपासून तब्बल ८० हजार फेक अकाऊंट्स
Updated on

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांने १४ जून २०२० ला आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला जवळपास तीन महिने झाले. मात्र अद्यापही सुशांतच्या मृत्यूवरुन सुरु असलेला वाद अद्याप संपलेला नाही. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांद्वारे सुरु करण्यात आला. मात्र मुंबई पोलिस या प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याचा आरोप झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होऊ लागली. याच दरम्यान  मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी या कालावधीत सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

या ८० हजार फेक अकाऊंटसच्या माध्यमातून बदनामी केली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून मुंबई पोलिस योग्य पद्धतीने करत होते. मात्र काही जणांनी ठरवून मुंबई पोलिसांची या प्रकरणात बदनामी केली आणि  काहींनी तर ठरवून मोहिम चालवली गेल्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या एम्सनं देखील आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटलं नसल्याचे ते म्हणाले.  मात्र मुंबई पोलिसांविरोधात रचलेल्या षडयंत्राची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात सुशांतची आत्महत्या आणि मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर करण्यात आलेली ही फेक अकाऊंटस् केवळ भारतातीलच नाही आहे. तर  इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स या अशा देशातूनही या पोस्ट करण्यात आल्यात.  १४ जूननंतर सुशांत मृत्यू तपास करणाऱ्या मुंबई पोलिस आणि राज्य सरकार यांना बदनाम करण्यासाठी ८० हजार फेक अकाउंट उघडली गेल्याचं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं म्हटलं आहे.

आम्ही परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant #sushantsinghrajput #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचं काम आम्ही करत असल्याचं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. 

मुंबई पोलिसांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलिस तपास करत असल्याचंही पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे. तसंच पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणालेत. 

कोविडच्या संकटात ८४ पोलिसांचा मृत्यू झाला. ६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची बाधा झाली, असं असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sushant Death Case Over 80 thousand fake accounts discredit Mumbai Police investigation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.