...म्हणून लोकलची प्रवासी क्षमता वाढवायला हरकत नाही; टाटा इन्स्टिट्यूटने दिली महत्वाची माहिती

...म्हणून लोकलची प्रवासी क्षमता वाढवायला हरकत नाही; टाटा इन्स्टिट्यूटने दिली महत्वाची माहिती
Updated on

मुंबई : लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेस बसत आहे. त्याचबरोबर आता कोरोनाचा प्रादुर्भाव आता मुंबईत हळूहळू कमी होताना दिसत आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु करताना मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली, त्याशिवाय इतर खासगी कार्यालयेही सुरु होत आहे. अनेक मुंबईकर कामावरही जात आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्याची ताकद मुंबईकरांमध्ये वाढत आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन नागरिक करत आहे. या परिस्थितीत सध्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याची गरज असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने म्हटले आहे.

मुंबई महापालिका आणि आयसीएमआर यांनी मुंबईत घेतलेल्या सिरो सर्वेक्षणात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचाही सहभाग घेतला होता होता. अनलॉकची प्रक्रिया सुरु करताना सरकारने दुकाने, मॉल खुली करण्यास परवानगी देत अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आता लोकलची प्रवासी क्षमता वाढवून साथ द्यायला हवी असे अहवालात म्हटले असल्याचे वृत्त आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. सध्या लोकलच्या सर्व मार्गावर मिळून सातशे फेऱ्या होत आहेत आणि त्याचा फायदा तीन लाख कर्मचाऱ्यांना होत आहे. लॉकडाऊनपूर्वी बृहन्मुंबईत दररोज सुमारे 75 लाख लोक प्रवास करीत होते. अर्थव्यवस्था हळूहळू खुली करावी लागेल. कोरोनाची लागण होण्याचा दर पाहून त्याचा वेग वाढवता येईल. आता काही प्रमाणात लागण झाल्यास त्यावर उपचार होऊ शकतील, असे टाटा इन्सिट्युटचे प्राध्यापक उल्हास कोल्थुर आणि प्राध्यापक संदीप जुनेजा यांनी म्हटले आहे. त्यांनी मुंबई सेरो सर्व्हेचे विश्लेषण करणारा अहवाल सादर करताना हे नमूद केले.

मुंबईतील लोकलमध्ये गर्दीच्यावेळी एका मीटरमध्ये चौदा जण प्रवास असतात. सध्याची क्षमता एका मीटरला एक प्रवासी आहे. त्याऐवजी क्षमता 30 टक्के करावी. त्याद्वारे 24 लाख प्रवाशांना मुभा देण्यात यावी. आता कार्यालयीन वेळा बदलल्यास हे शक्य आहे, असे जुनेजा यांनी सांगितले. झोपडपट्टीत रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यांच्यातील अँटीबॉडीज 57 टक्क्यापर्यंत आहेत, तर इमारतीतील रहिवाशांमध्ये 16 टक्के. मुंबईत कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी सुविधा आहेत. त्याचबरोबर आता लोकांमध्ये मास्कचा वापर वाढला आहे तसेच सुरक्षित अंतरही राखले जात आहे. त्यामुळे हळूहळू सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी सर्व काही एकाचवेळी सुरु केल्यास कोरोनाची दुसरी लाट येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.