Mumbai News : ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाला राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी!

घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्तता देणाऱ्या ठाणे-बोरिवली आणि बोरिवली-ठाणे या दुहेरी बोगद्याचे काम रखडले होते.
Thane Borivali Twin Tunnel
Thane Borivali Twin TunnelSakal
Updated on

मुंबई - घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्तता देणाऱ्या ठाणे-बोरिवली आणि बोरिवली-ठाणे या दुहेरी बोगद्याचे काम रखडले होते. मात्र या प्रकल्पासाठी महत्त्वाची असलेली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी प्राप्त आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या सहाय्याने ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर कमी होणार आहे ज्यामुळे या भागातील प्रवासाच्या वेळेत सुमारे १ तासांची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी महत्त्वाची असलेली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी प्राप्त आहे.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्याने प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा साध्य झाला आहे. मुंबई आणि ठाणे सारख्या गजबजलेल्या शहरात भूमिगत बोगद्याचे बांधकाम हा सध्याच्या रहदारीच्या आव्हानांवर उपाय तर आहेच पण शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

हा उपक्रम शहरी नियोजनाच्या दृष्टिकोणातून पर्यावरण संरक्षणासह प्रगतीचा समतोल साधण्यासाठी आणि भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एक मॉडेल म्हणून अधोरेखित होईल असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले आहे.

मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या सदर प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये १०.२५ किमीचा बोगदा आणि १.५५ किमीचा पोहचमार्ग असा १३.०५ मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे १२ किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूस २+२ मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे.

प्रत्येक ३०० मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक २ पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने करण्यात येणार आहे. सुमारे १२ किमी लांबीच्या प्रकल्पातील ४.४३ किमी लांबीचा ही ठाणे जिल्ह्यातून तर ७.४ किमी लांबी ही बोरीवलीमधून प्रस्तावित आहे.

प्रकल्पातील या बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावले जातील. बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे.

प्रकल्पाची किंमत ही सुमारे रुपये १६६०० कोटी इतकी असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचा ही समावेश आहे. प्रकल्पाची व्याप्ती आणि चॅलेंजस पाहता सदर प्रकल्प हा २ स्थापत्य आणि १ पॅकेज सुनियोजित वाहतूक प्रणाली संबंधित कामे अशा एकूण ३ पॅकेजेस मध्ये विभागला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.