ठाणे मृतदेह अदलाबदली प्रकरणी मोठी कारवाई, आयुक्तांची दिलगिरी

ठाणे मृतदेह अदलाबदली प्रकरणी मोठी कारवाई, आयुक्तांची दिलगिरी
Updated on

मुंबई- ठाण्यामध्ये पालिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची अदलाबदल झाल्याने एका कुटुंबावर दोनदा अंत्यसंसकार करण्याची वेळ आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता या प्रकरणी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोनावणे आणि गायकवाड कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली. याप्रकरणी कोविड रुग्णालयाचे डॉ. योगेश शर्मा यांची बदली करून चार नर्संना निलंबित केले आहे. ठाण्यातील ग्लोबल हब रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या मृतदेह अदलाबदलप्रकरणी महापालिका तसेच राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठविण्यात आली.  या प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल आला असून त्यात वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा झालेला नाही. मात्र, प्रशासकीय आणि कागदपत्रे बनवण्यामध्ये चूक झाल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना (इन्चार्ज) पदावरून हटविण्यात आलं आहे, तर चार नर्संना कामावरून निलंबित करण्यात आलं असल्याचं ठाणे महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सांगितलं. 

यापुढे ओळख पटवूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.  राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनीही याप्रकरणी कारवाईचे संकेत भाजपसह सोनावणे आणि गायकवाड कुटुंबीयांना गुरुवारी दिले.त्यापाठोपाठ, आयुक्तांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून दिलगिरी व्यक्त करण्याबरोबरच वैद्यकीयदृष्ट्या पालिकेची कोणतीही चूक नसल्याचीही सारवासारव केली.  तांत्रिकदृष्ट्या हा प्रकार घडल्यामुळे संबंधितांवर आपण कारवाई करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांची अन्यत्र बदली केली असून त्यांच्या जागी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून रुग्ण व्यवस्थापनामध्ये कोणतीही चूक होणार नाही, याची पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे.

दरम्यान कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या फाइलवर दर्शनी भागात त्याचे छायाचित्र लावले जाणार आहे. तसेच डिजिटल हॅण्डबॅण्ड प्रक्रियादेखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार करताना किंवा दुर्दैवाने मृत्यू झालाच, तर अदलाबदलीसारखे प्रकार होणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केले. 

नेमकं प्रकरण काय आहे?

कोविड रुग्णालयात दाखल असलेले कळव्याचे ७२ वर्षीय भालचंद्र गायकवाड बेपत्ता झाले होते. संतोष सोनावणे यांनी ८ जुलैला त्यांच्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र चार दिवसांपूर्वी त्यांनी अंत्यसंस्कार केलेला मृतदेह हा त्यांच्या वडिलांचा नसून भालचंद्र गायकवाड यांचा होता. दरम्यान गायकवाड कुटूंब गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मृतदेहाची प्रतिक्षा करत होते. रुग्णालयाकडून भालचंद्र गायकवाड यांचा मृतदेह गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर चूक लक्षात येताच 72 वर्षीय गायकवाड यांच्यावर सोनावणे कुटुंबाकडून अंत्यसंस्कार झाल्याचं समजलं.

सोनावणे कुटुंबाला अनावधाने त्यांच्याकडून गायकवाडांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले असून जनार्दन सोनावणे जिवंत असल्याचं फोनवर सांगण्यात आले. या बातमीनं सोनावणे कुटुंबाला आनंदाचा धक्का बसला, मात्र त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी देणारा पुन्हा दुसरा कॉल आला. दुसर्‍यांदा सोनावणे कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना मृतदेहाची पक्की ओळख पटवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर हा सोनावणे यांचाच मृतदेह असल्याची खात्री करून घेण्यात आली. दरम्यान गायकवाड कुटुंबाला देखील मृतदेहाच्या अदलाबदलीची माहिती देण्यात आली. 

अशा प्रकारे दोन्ही कुटुंबांना प्रचंड मनस्ताप झाला व रुग्ण अदलाबदलीमुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.  या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी विशेष करोना अधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली. समितीचा अहवाल बुधवारी रात्री आला आणि त्यानंतर आज गुरुवारी कारवाई करण्यात आली.

Thane Hospital Exchange Bodies doctor four nurses Dismissed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.