ठाणे - जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या "ऑक्सिटोसीन' औषधाची बिलाशिवाय खरेदी करून ते प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे अघोरी कृत्य करणारा औषध विक्रेता, फार्मासिस्ट आणि वितरक कंपनीच्या विरोधात रविवारी (ता. 20) येथील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाण्यातील एका रुग्णालयात 19 सप्टेंबरला प्रसूतीसाठी एक महिला दाखल झाली होती. या महिलेला "ऑक्सिटोसीन' औषधाची विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाचपाखाडी येथील लाईफ केअर मेडिकोचे भागीदार रवींद्र शिरोळे, फार्मासिस्ट ललिता झिंझाड आणि मेसिन रेमिडीज् इंडिया या औषध वितरक कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी याबाबतची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील पाचपाखाडीतील आधार हॉस्पिटलजवळ लाईफ केअर मेडिको हे औषधांचे दुकान आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी 24 ऑक्टोबरला या दुकानाची तपासणी केली असता "ऑक्सिटोसीन'ची विक्री केली जात असल्याचे त्यांना आढळले.
"ऑक्सिटोसीन' हे इंजेक्शन मेसिन रेमिडीज् इंडिया ही कंपनी तयार करते. विशेष म्हणजे या इंजेक्शनवर मानवी वापरासाठी नाही, अशी सूचना असतानाही आधार रुग्णालयात 19 सप्टेंबरला प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला बिलाशिवाय त्याची विक्री करण्यात आली होती.
औषधाचा प्रवास
लाईफ केअर मेडिको यांनी हे इंजेक्शन श्री जैन फार्मा (ठाणे) यांच्याकडून; तर त्यांनी युनायटेड फार्मा (कामोठे) यांच्याकडून खरेदी केले होते. युनायटेड फार्माने ते गाझियाबाद येथील रोमॅक्सो फार्माकडून खरेदी केले होती; तर या औषधाचे उत्पादन नवी दिल्लीतील सेक्टर सातमधील मेसिन रेमिडीज् इंडिया कंपनीमध्ये करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
|