Ulhasnagar News: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली नसताना उल्हासनगरात मात्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व टीम ओमी कालानीचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी युथ आयकॉन ओमी कालानी हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांची निशाणी ही पप्पू कालानी असणार अशी घोषणा केल्याने शहरातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.
माजी आमदार पप्पू कालानी हे जेलमध्ये गेल्यावर त्यांचे सुपूत्र ओमी कालानी यांनी राजकारणाची सूत्रे हाती घेतली होती.त्यांनी 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांची आई ज्योती कालानी यांना टीम ओमी कालानी टीमच्या शिलेदारांच्या सक्रियतेने राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणले होते.
ज्योती कालानी यांनी भाजपचे कुमार आयलानी यांचा पराभव केला होता.पुढे टीम ओमी कालानी यांच्या टीमने 2017 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.पण त्यांना चिन्ह मिळाले नसल्याने ओमी कालानी टीमने भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली व ओमी यांच्या करिष्म्यामुळे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भाजप प्रथमच सत्तेत आली आणि मीना आयलानी यांना महापौर पदाचा मान मिळाला.
त्यानंतर 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी कालानी कुटुंबियांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता.मात्र भाजपाने घुमजाव केल्याने ओमी कालानी यांनी पुन्हा राष्ट्रवादीशी घरोबा केला.ज्योती कालानी यांना उभे केले.
मात्र कुमार आयलानी यांनी ज्योती कालानी यांचा काही हजार मतांच्या फरकाने पराभव केला.ओमी यांनी भाजपच्या घुमजावचा वचपा काढण्यासाठी अडीच वर्षांतरच्या महापौर निवडणुकीत शिवसेनेशी हातमिळवणी केली.त्यात भाजपाचा पराभव झाला आणि शिवसेनेच्या लिलाबाई आशान महापौर पदावर विराजमान झाल्या.याघडीला पंचम कालानी ह्या राष्ट्रवादी(शरद पवार)यांच्या जिल्हाध्यक्ष असून मागच्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उल्हासनगरात आल्यावर पंचम कालानी यांनी पवार यांच्या कार्यक्रमात अनुपस्थिती दर्शवली होती.पण खासदार डॉ.श्रीकांत शिंदे लग्न समारंभात आले असता पप्पू कालानी हे कारमध्ये शिंदे यांच्या सोबत कारमध्ये असल्याचे व्हायरल झाले होते.
अशातच ओमी कालानी यांनी मी कोणत्याही पक्षात असो खासदारकीच्या निवडणुकीत डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ उघडपणे उतरणार आणि आमदारकीची निवडणूक अपक्ष लढवणार अशा दोन कमिटमेंटचा गौप्यस्फोट केला होता.
दरम्यान संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या महाएल्गार सभेसाठी शरद पवार हे नुकतेच शहरात आले होते.तेंव्हा त्यांनी सभेपूर्वी प्रथम कालानी महालाला भेट देऊन ओमी कालानी व पंचम कालानी यांची आणि पप्पू कालानी यांच्या वेगवेगळ्या भेटी घेतल्या होत्या.
तसेच शरद पवार हे सभे करिता निघाल्यावर ओमी कालानी यांनी महानगरपालिकेच्या सुपर स्पेशालिटी झिरो कॅश काऊंटर रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती.
प्रवक्ता कमलेश निकम यांनी ओमी कालानी हे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी उघडपणे उतरणार आहेत.तसेच ओमी कालानी हे आमदारकीची निवडणूक लढवणार व त्यांची निशाणी पप्पू कालानी असणार अशी घोषणा केली आहे.
चार वेळेस आमदार राहिलेले पप्पू कालानी हे जेल मधून बाहेर आलेले आहेत.ते नागरिकांच्या गळ्यातील ताईत असून ते सुखदुःखाच्या ठिकाणी सहभागी होतात.ओमी कालानी हे विधानसभा निवडणूक ही पप्पू कालानी यांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार असून तीच खरी निशाणी असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.