ठाणे - मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील पारसिक बोगद्याच्या माथ्यावर वाढलेल्या झोपडपट्ट्यांनी येथील रेल्वे मार्गाचा गळा घोटला असून आता त्यांचा प्रवास मुंब्रा परिसरातील धीम्या मार्गावरील बोगद्यांच्या दिशेने सुरू झाला आहे. वन विभागाच्या जागांवरील झोपड्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढू लागल्याने धीम्या मार्गावरील बोगदे संकटात सापडले आहेत. मुंब्रा डोंगररांगांवरील पर्यावरणाच्या नष्टचर्याबरोबरच येथील रेल्वे रुळांवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे येथील स्थानिक आणि रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवासी संघटनांनी याविरोधात आवाज उठवावयास सुरुवात केली आहे. यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन लवकरच ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी कल्याणच्या दिशेने जात असताना जलद किंवा धीम्या या दोन रेल्वे मार्गांवरून पुढे जातात. त्यापैकी कळवा, मुंब्रा आणि दिव्याला राहणाऱ्या प्रवाशांना जलदमार्गाचा पर्याय नसल्याने या प्रवाशांना धीम्या मार्गावरून प्रवास करावा लागतो. रेल्वेच्या धीम्या मार्गावर पारसिक बोगद्याप्रमाणेच मुंब्रा दिशेला दोन छोटे बोगदे असून या बोगद्यांवर सध्या तरी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. अत्यंत मोकळा आणि निसर्गसंपन्न असलेला हा भाग पारसिक डोंगराच्या सौंदर्यात अधिक भर घालतो. असे असले, तरी काही वर्षांत येथे वाढलेल्या झोपड्यांनी पारसिक बोगदा गिळंकृत केला असून त्यांनी आता आपला मोर्चा धीम्या मार्गावरील रेल्वे रुळांवरील बोगद्याच्या दिशेला वळवला आहे. कल्याण-डोंबिवली या मोठ्या शहरांबरोबरच अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा यांच्यासह ठाण्यापल्याडच्या स्थानकांना जोडणारी रेल्वेची धीमी मार्गिका त्यामुळे संकटात सापडली आहे.
मुंब्रा डोंगरावरील परिसरातील जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे या भागात मनमानी पद्धतीने झोपड्या वसवल्या जात आहेत. शिळ डायघर आणि पातलीपाडा परिसरात या महिन्यात कारवाई करून काही झोपड्या तोडण्यात आल्या असल्या, तरी मुंब्रा डोंगराकडे वन विभागाने डोळेझाक केली आहे. रेल्वेने येथील जमीन धोकादायक असून कधीही दरड कोसळू शकते असा धोक्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून येथे बांधकाम सुरू आहे.
लता आरगडे, महिला प्रतिनिधी, रेल्वे प्रवासी संघटना
कच्च्या झोपड्यांपासून पक्की घरे
अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने धीम्या मार्गाच्या आजूबाजूला अतिक्रमणे वाढली असून अवघ्या काही दिवसांत त्यांचा विस्तार होत आहे. सुरुवातील साध्या बांबूच्या आणि प्लास्टिक किंवा ताडपत्रीच्या साह्याने घरे बांधली जातात. त्यानंतर पुढील जागा मोकळी करून तेथे दुसरी झोपडी बांधली जाते. त्यानंतर जुनी झोपडी तोडून त्याचे पक्के बांधकाम केले जाते. सुरुवातीला वीजजोडणी घेऊन त्यानंतर नळजोडण्याही घेतल्या जातात. स्वच्छतागृहाची वानवा असल्याने रेल्वे रुळांवर प्रातर्विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे रोगराईचे प्रमाणही येथे वाढत आहे. या झोपड्या अवघ्या काही हजारांपासून लाखोंच्या किमतीने विकल्या जातात. त्यानंतर पुन्हा पुढील बांधकाम केले जाते. मतदारसंघ वाढवण्यासाठी काही मंडळींकडून या झोपड्या वसवल्या जात असून अवघ्या दोन वर्षांमध्ये हा संपूर्ण भाग झोपड्यांनी व्यापल्याचे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.