पोपटीचा नवा ट्रेंड ; भरलेल्या चिंबोऱ्या अन म्हावऱ्याची अनोखी लज्जतदार खाडीची पोपटी

भरलेल्या खाऱ्या चिंबोऱ्या, कोलंबी आणि मासे यांची अनोखी लज्जतदार पोपटी खाल्लेय का कधी? सध्या रायगड जिल्ह्यात या पोपटीचा ट्रेंड सुरू आहे. आणि या अनोख्या पोपटीची मागणी देखील खूप आहे.
पोपटीचा नवा ट्रेंड ; भरलेल्या चिंबोऱ्या अन म्हावऱ्याची अनोखी लज्जतदार खाडीची पोपटी
Updated on

पाली : रायगड जिल्ह्यात लज्जतदार पोपटी पार्ट्यांची सुरुवात झाली आहे. वालाच्या शेंगा व चिकन ची पोपटी सर्वांनाच माहिती आहे. मात्र भरलेल्या खाऱ्या चिंबोऱ्या, कोलंबी आणि मासे यांची अनोखी लज्जतदार पोपटी खाल्लेय का कधी? सध्या रायगड जिल्ह्यात या पोपटीचा ट्रेंड सुरू आहे. आणि या अनोख्या पोपटीची मागणी देखील खूप आहे.

मी बेलपाडकर या युट्युब चॅनलचे निर्माते उरण तालुक्यातील रहिवासी गणेश कोळी यांनी सांगितले की याला खाडीतील पोपटी नाव दिले आहे. खाडीतून पकडलेल्या ताज्या चिंबोऱ्या, फंटूस किंवा इतर कोणतेही मासे आणि मोठ्या कोलंब्या या पोपटीत टाकल्या जातात. यासाठी विशेष स्थानिक मसाला सुद्धा वापरला जातो. तसेच वालाच्या शेंगांबरोबरच तूर व मटारच्या शेंगा देखील टाकल्या जातात. ही अनोखी पोपटी ठराविक लोकच चांगल्या प्रकारे बनवतात, त्यासाठी विशेष तयारी देखील करावी लागते. युट्युब चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ही विशेष खाडी पोपटी सर्वदूर पसरली असून अनेकजण तिची लज्जत चाखण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत. असे गणेश कोळी यांनी सांगितले.

पोपटी साठी साहित्य

गावठी वालाच्या टपोऱ्या शेंगा, मटार व तुरीच्या शेंगा. भरलेल्या खाडीच्या चिंबोऱ्या, फंटूस मासे, मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या चिंबोऱ्या, स्थानिक मसाला. जाडे मिठ व भामरुडीचा (भांबुर्डी) पाला, अल्युमिनियम फॉईल आणि हे सर्व जिन्नस शिजविण्यासाठी पत्र्याचा डबा व जळणासाठी लाकूड, पेंढा इत्यादी.

पारंपरिक पोपटी पेक्षा वेगळी

वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्या मध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजवल्या जातात. त्यामध्ये कांदा, बटाटा, रताळी तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढवली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. चिरनेर येथील तुषार परदेशी या तरुणाने सांगितले की ही खाडीतील पोपटी थोडी वेगळी असते, पत्र्याच्या डब्यात भामरुडाच्या पाला टाकून त्यावर वाल, तूर व मटारच्या शेंगा टाकल्या जातात, त्यावर मीठ पसरले जाते. त्यानंतर केळीचे पान ठेवून मसाला लावलेल्या चिंबोऱ्या ठेवल्या जातात.

त्यानंतर परत केळीचे पान ठेऊन मसाला लावलेल्या मोठ्या कोलंब्या ठेवल्या जातात, त्यावर पुन्हा केळीचे पान ठेवून मसाला लावलेले व अल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळलेले मासे ठेवायचे आणि त्यावर केळीचे पान ठेऊन त्यावर वाल, तूर व मटारच्या शेंगा टाकल्या जातात आणि त्यावर भामरुडाच्या पाला टाकून पत्र्याचे झाकण नीट बंद केले जाते. आणि डबा उपडा करून त्याबाजूने लाकडे व पेंढा टाकून आग लावली जाते. 35 ते 40 मिनिटांमध्ये खाडीतली पोपटी आणून तयार होते. मग सगळे एकत्र मिळून या पोपटीची मजा लूटतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.