ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिटच नाही

किन्हवली : जीर्ण झालेला काळू नदी पूल
किन्हवली : जीर्ण झालेला काळू नदी पूल
Updated on

किन्हवली : शहापूर तालुक्‍यातील किन्हवलीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि शहापूर-मुरबाड या दोन तालुक्‍यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे संगमेश्वरचा काळू नदीवरील पूल. सध्या 57 वर्षे आयुर्मान असलेला हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. त्यातच या पुलाचे अजूनपर्यंत स्ट्रक्‍चरल ऑडीटच झाले नसून देखभाल दुरुस्तीसाठी काय खर्च झाला, याची माहिती निरंक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, 19 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात वाहनाने या पुलाच्या कठड्याला जोरात धडक दिल्याने पुलाची हानी झाली असून पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री एम. एस. कन्नमवार यांच्या हस्ते 10 जून 1963 ला पुलाचे उद्‌घाटन झाले होते. तत्पूर्वी 7 एप्रिल 1960 मध्ये पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली व पुलाचे काम 31 मे 1963 मध्ये पूर्ण झाले. या पुलाची नदीपात्रापासून उंची 45 फूट तर लांबी 552 फूट आहे. या पुलाला 60 फुटांच्या 8 कमानी असून रस्त्याची रुंदी 22 फूट आहे. पुलाच्या बांधकामाचा एकूण खर्च 5 लाख 50 हजार इतका झाला होता. दोन वर्षांपासून शहापूर-लेनाड-मुरबाड मार्गावरील काळून नदीवरील पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने शहापूर-किन्हवली-सरळगाव या मार्गावरून वाहतूक वाढली आहे. 

अहोरात्र अवजड वाहने व इतर पर्यायी वाहतूक या पुलावरून होत आहे. सध्या शेणवे-किन्हवली-सरळगाव या रस्त्याचे अन्युईटी हायब्रीड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरू असले तरी काळू नदीवरील संगमेश्वर पुलाची डागडुजी मात्र होताना दिसत नाही.

पुलाचे कठडे कमकुवत झाले असून मध्येच पिंपळ, वड यासारखी झाडे रुजली असून त्यांची मुळे घट्ट रोवली आहेत. सध्या पुलावरून वाहतूक करताना प्रवाशांना व वाहन चालकांना धडकी भरते. या पुलाची डागडुजी करून नूतनीकरण केल्यास पुलाचे आयुष्य वाढेल, अन्यथा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला व उपेक्षितांचे जीणे जगणारा काळू नदीवरील पूल इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

 वाहनाच्या धडकेत पुलाच्या कठड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अन्युईटी हायब्रीडच्या रस्त्याची ठेकेदार कंपनी मिलन असोसिएटद्वारे या पुलाची संपूर्ण दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात येणार आहे. 
- अरुण जाधव, उपअभियंता, 
बांधकाम विभाग, शहापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.