'हॅप्पी हायपोक्सिया' ! कोरोना रुग्णांमध्ये आढळून येतायेत 'ही' जीवघेणी लक्षणं, वाढतोय मृत्यूचा धोका

'हॅप्पी हायपोक्सिया' ! कोरोना रुग्णांमध्ये आढळून येतायेत 'ही' जीवघेणी लक्षणं, वाढतोय मृत्यूचा धोका
Updated on

मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये 'हॅप्पी हायपोक्सिया' ची लक्षणे आढळत असून ही लक्षणे जीवघेणी ठरत असल्याचे समोर आले आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अचानकपणे कमी होत असल्याने आरोग्याची कोणतीही समस्या नसलेल्यांमध्ये यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य यंत्रणांपुढे नवे आव्हान यामुळे उभे ठाकले आहे.

कोरोना संसर्गासह रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्यासह मुंबईत ही वाढली आहे. राज्यातील मृत्यूचा दर हा 3 टक्क्यांवरून 6 टक्क्यांच्या आसपास पोचला आहे. महत्वाचे म्हणजे दीर्घकालीन आजार नसलेल्या तरुण रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ही वाढतांना दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या 178 मृत्यूमध्ये दीर्घकालीन आजार नसलेल्यांचे प्रमाण 19 टक्के एवढे होते ते आता वाढल्याचे दिसत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने कोरोनाच्या 447 मृतांचे विश्लेषण केले त्यात 26 टक्के मृत्यू पावलेल्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब, श्वसनविकार तसेच ह्रदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा त्रास नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. 

कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण हे साधारणता 70 टक्के आहे. त्यातील प्रकृती सामान्य असलेल्या तरुण रुग्णांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा रुग्णांमध्ये 'हॅप्पी हायपोक्सिया' असल्याचे समोर आल्याने त्यांच्या मृत्यूमागील हे ही एक कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'हॅपी हायपोक्सिया'मुळे धडधाकट दिसणाऱ्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अचानक कमी होत असल्याने तब्येत खालावण्याचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी बैठक घेऊन यावर चर्चा केली असून रुग्णांच्या आरोग्य तपासण्या बारकाईने करण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे उप संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यास सुरुवात
कोरोना रुग्णांमध्ये 'हॅपी हायपोक्सिया' अडसर ठरत असल्याने प्रशासनाने काही उपाय योजना सुरू केल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांसह कंटेंटमेंट झोन मधील लोकांचे पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यास सुरुवात केली असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. 'हॅपी हायपोक्सिया' हा कोणताही नवा आजार नाही. कोरोनाची लक्षणे नसलेल्या काही रुग्णांमध्ये जरी याची लक्षणे सापडली असली तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे ही डॉ आवटे यांनी सांगितले. प्रशासन योग्य ती काळजी घेत असल्याचे ही ते म्हणाले.

हॅपी हायपोक्सिया म्हणजे काय ?

व्यक्तीच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी होणे यास हायपोक्सिया असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीने आपल्या श्वासाद्वारे घेतलेला प्राणवायू श्वासातून फुफ्फुसात शोषला तेथून तो रक्तात त्यानंतर संपूर्ण शरीरात शोषला जातो. मात्र जेव्हा रक्तातील प्राणवायू कमी होतो तेव्हा मेंदुला होणारा प्राणवायूचा पुरवठयात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे व्यक्तीला दम लागणे , गरगरणे , गुदमरणे , बेशुद्ध पडणे अश्या प्रकारचा त्रास जाणवू शकतो. मात्र काही व्यक्तींमध्ये शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले तरी त्याला वरील पैकी लक्षणे जाणवत नाहीत. त्याला 'हॅपी हायपोक्सिया' किंवा 'सायलेंट हायपोक्सिया' असे म्हटले जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.