नेरळः रायगड जिल्ह्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आंबेवाडी येथील धबधब्यावर 28 ऑगस्टला पर्यटक वर्षासहलीसाठी आले होते. दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे धबधब्यातून वाहणाऱ्या नाल्याला नदीचे स्वरूप आले आणि दुथडी वाहणारा नाला पार करणे शक्य झाले नाही. मात्र, स्थानिक तरुणांनी ७ वाजता पाण्याचा जोर ओसरल्यावर त्या आठ पर्यटकांनी बाहेर काढले. दरम्यान, पाणवठ्याच्या ठिकाणी येण्यास बंदी असताना पर्यटक धबधब्यापर्यंत पोहचतात कसे, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.
नेरळ गाव माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याशी वसले असून, या भागात चार ठिकाणी मोठे धबधबे आहेत. टपालवाडी येथील धबधबा तर सर्वांत आकर्षक असून, नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सर्व धबधबे यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्षासहलप्रेमी दर वर्षी येत असतात. धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात यापूर्वी अपघात झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व धरण, तलाव, धबधबे आणि पाणवठे यांच्यावर जाण्यास जमावबंदी आदेश लावले आहेत. परिणामी मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही खूप कमी प्रमाणात पर्यटक वर्षीसहलीसाठी आले आहेत. त्यात आंबेवाडी येथे असलेल्या धबधब्यावर नेरळ पोलिसांची नजर चुकवून कल्याण आणि अंबरनाथ येथील आठ पर्यटक वर्षासहलीसाठी दुचाकी घेऊन आले होते. 28 ऑगस्टला दुपारपर्यंत उघडीप घेतलेल्या पावसाने दुपारपासून जोरदार हजेरी लावली. साधारण पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धबधब्यातील पाणी ज्या नाल्यातून नेरळ गावाकडे येते, त्या नाल्यातुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले.
माथेरानच्या डोंगरात सतत चार तास पाऊस होत असल्याने नाला दुथडी वाहत होता. मात्र, पाच वाजता घरी जाण्यासाठी तयारी करणारे ते आठ तरुण दुथडी नाला पार करता येत नव्हता. त्यात हा धबधबा आंबेवाडी आणि नवीन आंबेवाडी या वाड्याच्या लोकवस्तीपासून जंगलात लांब अंतरावर आहे. त्यामुळे त्या आठ तरुणांबद्दल कोणालाही माहिती नव्हते. आंबेवाडीमधील नितीन निर्गुडा, बाळू निर्गुडा, गोविंद निर्गुडा, परशुराम पारधी, भास्कर पारधी हे गणेशोत्सवासाठी पायरमाळ येथे आले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने त्या सर्वांनी आंबेवाडी येथे घरी जाण्याचा रस्ता धरला असता नाल्यावर त्यांना आठ तरुणांनी मदतीसाठी हाका मारत होते. तेथे जाऊन आंबेवाडीमधील तरुणांनी वाडीमधून आणखी काहींना मदतीसाठी बोलावले. 15 आदिवासी तरुणांच्या गटाने मग धबधब्याच्या नाल्याजवळ अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. आदिवासी तरुणांनी नंतर हाताचे कडे करीत नाल्यात उतरून एका एका पर्यटकांना बाहेर काढण्याचा काम केले. त्या आठ जणांमध्ये चार महिला पर्यटक होत्या.
साधारण साडेसहा वाजता सर्व आठ तरुणांना बाहेर काढण्यात आदिवासीवाडीमधील तरुणांना यश आले, अशी माहिती नितीन पारधी यांनी दिली. त्या सर्वांना बाहेर काढल्यानंतर स्थानिकांनी तुम्ही कोणाच्या परवानगीने धबधब्यावर आले. सर्व धबधब्यांवर यायला जमावबंदी आदेश लागू असल्याने हा आदेश मोडला म्हणून सर्वांना पोिलस ठाण्यामध्ये नेण्याची सूचना जेष्ठ ग्रामस्थांनी केली. मात्र, अशी चूक पुन्हा होणार नाही आणि आमचे घरचे लोक आमची वाट पाहत आहेत, अशी विनवणी करू लागल्याने शेवटी सर्वांना समज देऊन सोडण्यात आले.
(संपादन ः बापू सावंत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.