चालक परवाना नियमांत बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : परिवहन विभागाच्या (Regional Transport office) मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध सेवा ऑनलाईन (online) करण्यात आल्या आहेत. याच ऑनलाईन सेवांमध्ये आता बदल झाल्याने वाहनचालक शिकाऊ परवाना (Learning license), पक्का परवाना, परवान्याची वैधता, वैधता संपल्यानंतर परवाना नूतनीकरणाच्या दक्षतेसंदर्भात नागरिकांनी (License renewal) माहिती करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या व्यक्तींना शिकाऊ परवान्याची आवश्यकता आहे, अशा व्यक्ती संकेतस्थळाला (website) भेट देऊन परवाना स्वतः प्राप्त करू शकतात. शिकाऊ परवाना प्राप्त करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत.
आपल्या सोयीनुसार पर्याय निवडून ऑनलाईन फॉर्म सादर करावयाचा आहे. वय ४० च्या आत आधार कार्डधारक व्यक्तींना शिकाऊ परवाना प्राप्त करण्यासाठी फक्त सही अपलोड करावयाची आहे. मात्र आधार कार्डमध्ये बदल असल्यास त्यांना मूळ कागदपत्रांसोबत आरटीओमध्ये जावे लागेल. वय वर्षे ४० पेक्षा जास्त असलेल्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करून तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये यावे लागेल. आधार कार्ड शिवाय ज्या व्यक्तींना शिकाऊ परवाना प्राप्त करावयाचा आहे, त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये येऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल.
शिकाऊ परवान्यासाठी शुल्क
शिकाऊ परवाना आधार आधारित सेवा-शिकाऊ परवाना आधारविरहित सेवा
चाचणी शुल्क ५० रुपये - चाचणी शुल्क ५० रुपये
परवाना शुल्क १५० रुपये - परवाना शुल्क १५० रुपये
एकूण शुल्क २०० रुपये - एकूण शुल्क २०१ रुपये
अतिरिक्त वर्ग शुल्क १५० रुपये - अतिरिक्त वर्ग शुल्क १५१ रुपये
पक्क्या परवान्यासाठी अर्ज...
शिकाऊ परवाना प्राप्त केल्यानंतर शिकाऊ परवाना जारी केलेल्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीनंतर अर्जदारास पक्क्या परवान्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. प्रत्येक वाहन संवर्गाकरिता स्वतंत्र शिकाऊ परवाना जारी करण्यात येतो. पक्का परवाना एकच असल्यामुळे पक्या परवान्याकरिता अर्ज करताना अर्ज केलेले सर्व वाहन संवर्ग एकत्रित सीलेक्ट करून त्याकरिता विहित शुल्क भरणा करता येतो. वैद्यकीय प्रमाणपत्र हे शिकाऊ परवान्याच्या वेळी अपलोड केले असल्याने पक्क्या परवान्याच्या वेळी ते पुन्हा अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
परिवहन वाहन, तसेच जड वाहन संवर्गाकरिता शिकाऊ परवाना प्राप्त केला असल्यास पक्क्या परवान्याच्या वेळी अधिकृत मोटार ट्रेनिंग स्कूलमार्फत विहित प्रशिक्षण प्राप्त करणे व त्यासंबंधी असलेले ५ अ या विहित नमुन्यामध्ये प्रमाणपत्र मोटार ट्रेनिंग स्कूलमार्फत प्राप्त करून ते अपलोड करणे आवश्यक आहे.
तर परिवहन वाहन संवर्गाकरिता परवाना वैधता ही ५ पाच वर्षे असून धोकादायक पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहन संवर्गाकरिता परवाना वैधता तीन वर्षे इतकी देण्यात येते. पक्क्या परवान्याच्या चाचणीकरिता आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालयामध्ये प्रतिदिन ९०० वाहन संवर्ग इतका कोटा ठेवण्यात आलेला आहे. त्याकरिता परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर स्लॉट बुकिंग ही सुविधा उपलब्ध आहे.
परवाना वैधतेबाबत
मोटार वाहन विभागाकडून जारी करण्यात येणारा परवाना वैधतेबाबत नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत आता परवानाधारकाच्या वयानुसार परवान्याची वैधता ठरवली जाते.
धारकांचे वय - वैधता
- वय वर्ष ३० पर्यंत - धारक व्यक्तीच्या वयाच्या ४० वयापर्यंत
- वय वर्ष ३१ ते ५० पर्यंत - जारी केल्याच्या दिनांकापासून पुढील १० वर्षाकरिता
- वय वर्ष ५१ ते ५५ पर्यंत - धारक व्यक्तीच्या वयाच्या ६० वर्षापर्यंत
- वय ५५ वर्ष नंतर - जारी केल्याच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षाकरिता
यामध्ये धारकाने पुन्हा शिकाऊ परवाना प्राप्त करून वाहन चालविण्याची चाचणी देणे ही अतिरिक्त प्रक्रिया टाळण्याकरिता परवान्याची वैधता संपण्याआधी १ वर्षांचे आत परवाना
नूतनीकरणाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची दक्षता धारकांना घ्यावी लागणार आहे.
परवाना नूतनीकरण
परवान्याची वैधता संपल्यानंतर एक वर्ष झाले असल्यास अशा धारकांकरिता पुन्हा चाचणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १५ मधील तरतुदीनुसार परवान्यामध्ये असलेल्या प्रत्येक वाहन संवर्गाकरिता शिकाऊ परवाना प्राप्त करून विहित शुल्क भरणा केल्यावर वाहन चाचणीकरिता स्लॉट आरक्षित करून चाचणी उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त आहे. धारकाने त्याच्या परवान्याची वैधता संपण्याआधी अथवा संपल्यावर एका वर्षांचे आत नूतनीकरणाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास केवळ ऑनलाईन विहित अर्ज व त्यासोबतच्या कागदपत्रांच्या प्रिंट प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावयाच्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.