रायगडावरील ३५० वास्तूंची माहिती उजेडात; गडाला मिळणार गतवैभव
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर (Raigad Fort) सध्या संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामात शिवरायांचा पराक्रम, ऐतिहासिक ठेवा, त्या काळातील संस्कृती हळूहळू उजेडात येत आहे; तर उत्खननाच्या कामातून गडाचे अनेक पैलू समोर येणार आहेत. गडाला गतवैभवही मिळणार आहे. रायगड किल्ल्याचा वास्तूंचा एरियल सर्वे (Arial survey for vastu) करण्यात आला आहे. याद्वारे गडावरील सुमारे साडेतीनशे वास्तूंची माहिती समोर येत आहे.
रायगडाला रायगड, रायरी, नंदादीप, शिवलंका, राहीर, पूर्वेकडील जिब्राल्टर आदी नावे होती. मेघडंबरी, खुबलढा बुरूज, नाणे दरवाजा, महादरवाजा, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राज सदर, रत्नशाळा, राज भवन, बाजारपेठ, नगारखाना, शिर्काई मंदिर, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी आदी ठिकाणे पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने येतात.
स्वराज्याची राजधानी असणाऱ्या या रायगडावर येणारे शिवप्रेमी गडाची दुरवस्था पाहून दुःखी होत होते. राजधानीला गतवैभव मिळावे, अशी त्यांची मागणी होती. त्यानुसार रायगड संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. ६६० कोटी रुपयांचा आराखडा यासाठी तयार करण्यात आला. या माध्यमातून गडावर अनेक कामे सुरू आहेत. पुरातत्त्व संशोधन विभाग हे काम करत असून अनेक दुर्लभ माहिती यातूनच शिवप्रेमींना आगामी काळात मिळणार आहे. नवीन रायगडचे दर्शनही होणार आहे.
रायगड किल्ल्याचा वास्तूंचा एरियल सर्वे करण्यात आला आहे. याद्वारे गडावरील सुमारे साडेतीनशे वास्तूंची माहिती समोर येत आहे. राजवाडे व त्या ठिकाणचे उत्खनन केले जाणार आहे. राजसदरेवर उभे राहिले की समोरच दिसणारे अष्टप्रधान मंडळाचे वाडे, बाजूला असणारा राणीवसा या ठिकाणी आता उत्खननाचे काम सुरू झाले. काही राजवाड्यांचा उत्खननामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तूदेखील सापडल्या. यामध्ये प्रामुख्याने नक्षीकाम असणाऱ्या सोन्याच्या बांगडीने त्या काळातील कलाकुसार पुढे आणली. त्या काळातील भांडी, ऐतिहासिक वास्तू, पूजा साहित्य, शस्त्र, दागिने अशा विविध वस्तूंचा ठेवा या उत्खननातून पुढे आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात गडावरील उत्खनन करणे यासाठी मोठा कालावधी देखील लागणार आहे.
२५ टाक्यांची स्वच्छता
संवर्धनातून रायगडावर जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती झाली आहे. रोप-वेपासून पुढे जाणारी मार्गिका देखील तयार करण्यात आली आहे. सध्या गडावर येणाऱ्या पर्यटकांना पाणीटंचाई जरी भासत असली तरी त्या काळात पाण्याचा मुबलक साठा होता. गडावर लहान-मोठी ८४ पाण्याचे टाके आहेत. यापैकी सुमारे २५ पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. हत्ती तलावाची गळती काढल्यानंतर या तलावातदेखील आता पाणी साठू लागले आहे. रायगडावरील बुरूज, गडावरील तटबंदी, विविध ठिकाणची वास्तू यांचे जतन येत्या काळात केले जात आहे.
- महादरवाजाला ऐतिहासिक स्वरूप पुन्हा देण्यात आले.
- गडावर पालखी जाण्यासाठी नाणे दरवाजाचा वापर केला जात असे. त्यालाही गतवैभव देण्याचे काम सुरू.
- गडावरील नगारखाना, जगदीश्वर मंदिराला ‘केमिकल वॉश’ काम पूर्ण
- ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, राजदरबार, नगारखाना, जगदीश्वर मंदिर आदींची कामे सुरू
- गडावरील दरवाजांची पुनर्बांधणी
- तटबंदी सुधारणा वेगाने सुरू
- पर्यटकांसाठी पाणीपुरवठा योजना, वृक्ष लागवड आणि ध्वनी व प्रकाश योजना अशी अनेक कामे लवकरच पूर्ण होणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.