कडधान्य पिकाला साडीच्या कुंपणाचे संरक्षण
पाली, ता. १३ (वार्ताहर) : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कडधान्याची शेती केली जाते. या कडधान्य पिकाचे शेळी व गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताला साड्यांचे कुंपण करत आहेत. ही अतिशय वेगळी बाब समोर आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर आमटेम गावाजवळ दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात असे कुंपण लावलेले शेत दृष्टिक्षेपास पडतात. सुधागड व इतर तालुक्यांतील शेतकरी अशा प्रकारचे कुंपण आपल्या शेतांना लावत आहेत. पक्क्या भिंतीचे किंवा लोखंडी जाळी व तारांचे कुंपण करणे परवडत नसल्याने सर्वसाधारणपणे शेतकरी आपल्या शेताला करवंदाची जाळी, काटेरी पेरकूट किंवा काट्याकुट्यांचे कुंपण करतात. मात्र, रानमोडीने जिल्ह्यातील करवंदाच्या जाळीचे नुकसान केले आहे. पेरकूट व काट्याकुट्याही कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे कुंपणासाठी घरातील जुन्या साड्या वापरल्या जातात, असे शेतकरी दीपक कोकरे यांनी सांगितले. हे कुंपण तयार करण्यास सोपे आणि कमी खर्चिक व श्रमाचे असल्याने अनेक जण त्याला पसंती देतात. यामुळे कडधान्य पिकाचे गुरे व शेळ्यांपासून संरक्षण होते. तर शेतकरी मनीष पाटील म्हणाले की, गरीब व आदिवासी शेतकऱ्यांसाठी हे कुंपण वरदान ठरत आहे.