रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी हमी भावाच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत
कर्जत : रायगड जिल्ह्यात (Raigad) हमी भाव केंद्रांवर भातविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र राष्ट्रीयीकृत बँकेत खाते (Nationalize bank account) नसलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. रत्नगिरी, पालघरसह अन्य १० जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती आहे. रायगड जिल्ह्यात ३८ हमीभाव केंद्रांवर भात खरेदी (fare rates for farm production) सुरू आहे. शेतकऱ्यांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत पाच लाख ३० हजार क्विंटल भातखरेदी झाली आहे. अशा केंद्रांवर राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांना १५ दिवसांत मोबदला मिळतो; तर उर्वरित शेतकरी अद्यापही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कर्जत तालुक्यात ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेत असल्याने त्यांनाही अद्याप मोबदला मिळालेला नाही. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचे समजते. मोबदल्याबाबत शेतकऱ्यांनी बँकांकडे विचारणा केल्यावर बँकेचे अधिकारी हे त्यांचा काही दोष नाही असे सांगतात. मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्यांचा मोबदला जमा केलेला नाही, असेही उत्तर देतात; तर काही वेळा तांत्रिक अडचण असून ती सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे उत्तर देतात, अशी माहिती प्रगतशील शेतकरी चंद्रकांत मांडे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात पाच लाख ३० हजार क्विंटल भात खरेदी - ३८ केंद्रांवर हमीभाव भात खरेदी सुरू - ८ फेब्रुवारीपर्यंत हमीभाव भात खरेदीला मुदतवाढ --- चिंता वाढली सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे. अन्य घरगुती कारणांसाठी पैशांची गरज आहे. भाताचा मोबदलाचा त्यांच्यासाठी आधार आहे, परंतु महिना, दीड महिन्यानंतरही हमीभावाचा मोबदला बँक खात्यावर जमा झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
राष्ट्रीयीकृत बॅंकांना आयएफएससी कोड असल्याने केंद्र सरकारकडून आलेल्या भात पिकाचा मोबदला तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो; मात्र जिल्हा बॅंकांना ही सुविधा नाही. कोअर बॅंकिंग पद्धतीनुसार काम करताना त्यांना दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून पैसे वर्ग करावे लागतात ही अडचण आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांची खाती जिल्हा बॅंकेत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत ही समस्या दूर होईल.
- के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी
कर्जत तालुक्यातील जिल्हा बँकेत खाते असलेले ५०० पेक्षा अधिक शेतकरी हमी भाव केंद्राकडून मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत.
- केतन खडे, व्यवस्थापक, कर्जत तालुका भात खरेदी-विक्री संघ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.