एसटीला आर्थिक फटका; रायगड जिल्ह्यातील ४५० एसटी कर्मचारी बडतर्फ
अलिबाग : राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप (St employee strike) पुकारला आहे. यामध्ये रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाल्याने एसटीला मोठ्या आर्थिक संकटाला (financial crisis) सामोरे जावे लागले. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाविरोधात महामंडळाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ४५० कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.
नोव्हेंबरपासून रायगड जिल्ह्यातील एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेले. ऐन प्रवासी हंगामात झालेल्या संपामुळे एसटी आर्थिक तोट्यात गेली. रस्त्यावर फिरणाऱ्या एसटी बस स्थानकात उभ्या राहिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एसटी महामंडळाने आवाहन केल्यानंतर आतापर्यंत ८५० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यात २५० चालक व वाहकांचा समावेश आहे. दोन हजार २५२ कर्मचाऱ्यांपैकी फक्त ३० कर्मचारी कामावर झाल्याने एसटीला काही प्रमाणात दिलासा मिळाला.
कोरोना नियंत्रणात आल्याने शाळा, कॉलेज सुरू झाले. सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू झाले; मात्र अद्याप काही एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्याचा परिणाम सेवेवर होत आहे. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये जाताना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार नोटिसा बजावून, आवाहन करूनदेखील कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. आतापर्यंत ४५० कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले.
दृष्टिक्षेप
- रायगड जिल्ह्यातील विभाग नियंत्रक यांच्या अखत्यारित अलिबाग, मुरूड, रोहा, माणगाव, महाड, पेण, कर्जत, श्रीवर्धन हे आगार
- जिल्ह्यात ५१० एसटी बस
- दिवसाला सुमारे १ लाख ९० हजार किलोमीटरचा प्रवास
- एसटीला दिवसाला सुमारे ३५ लाखापेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न मिळते.
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यरत होण्याचे वारंवार आवाहन केले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई सुरू केली. त्यानुसार नोटिसा बजावण्यात आल्या. कर्मचाऱ्यांची बाजू ऐकण्याचा प्रयत्न आहे; परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने निकाल त्यांच्या विरोधात दिला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत ४५० जणांना बडतर्फ केले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हजर व्हावे.
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड
राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. अनेकांना बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून न्यायालयाकडे धाव घेण्यात आली आहे.
- दिलीप पालवणकर, एसटी कर्मचारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.