रायगड : मानवनिर्मित वणव्यांमुळे वनांचा ऱ्हास; पक्ष्यांसाठी भूतदया
पाली : जिल्ह्यात वसाहतीकरण व औद्योगिकीकरणासाठी जंगलतोड (tree cutting) आणि मानवनिर्मित वणव्यांमुळे वनांचा ऱ्हास (fire in forest) यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहे. अनेक पक्षीप्रेमी (Bird Lover) व पर्यावरणप्रेमी यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मानवी वस्तीत दाण्यापाण्याची व्यवस्था करत आहेत. एप्रिल ते जून हा काही पक्ष्यांचा विणीचा हंगाम असल्याने काही जणांनी तर या पक्ष्यांसाठी घरटीही (Bird Nest) बांधली आहेत.
पक्षी इमारती, घरामध्ये, फ्लॅटच्या गॅलरी, लोखंडी पाईप, खिडक्या, पडक्या इमारती व पार्किंग अशा मिळेल त्या ठिकाणी स्वतःचे घरटे बांधून आपले अस्तित्व टिकवण्यास झगडताना दिसतात. त्यामुळे येथे त्यांना सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. विळे येथील पक्षी अभ्यासक राम मुंढे यांची छोटी मुलगी काही दिवसांपूर्वी घराच्या गॅलरीमध्ये उभी होती. तिला चिमणी, दयाळ आणि साळुंख्या गॅलरीमध्ये फिरताना दिसल्या. घराबाहेर आल्यावर बुलबुलही फिरताना दिसली. आता पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू होत आहे.
यासाठी ते घरटे बांधण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होत्या, हे मुंढे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या पक्ष्यांना राहण्यासाठी सुरक्षित घरटे बनवण्याचे ठरवले. ही घरटी बनवण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करण्याचे ठरवले. त्यांनी मित्र नीलेश लाड यांचे मेडिकलच्या दुकान गाठले आणि त्यांना घरट्याची कल्पना दिली. लाड यांनी भरलेल्या बरण्या रिकाम्या करून घरट्यासाठी दिल्या. मुंढे यांनी या प्लास्टिक बरण्यांना नारळाच्या टाकाऊ साली फेविकॉलच्या आधारे चिटकवल्या. कचऱ्यात टाकून दिलेल्या झाडूचे गवत व काड्यांपासून सुशोभित केले आणि पूर्णतः टाकाऊ वस्तूपासून उत्तम अशी घरटी तयार केली. किमान पाच ते सहा घरटी आणखी बनवून गॅलरी आणि फ्लॅटच्या सर्व खिडक्यांच्या कोपऱ्यात लावली. हे पाहून अनेकांनी हा उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे.
रोहा तालुक्यातील वांगणी गावात संकल्प मित्रमंडळ व उत्कर्ष मित्रमंडळ ही दोन मंडळे आणि तेथील तरुण काही वर्षांपासून उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतात. येथील भिसे खिंड येथे उन्हाळ्यात पशूपक्ष्यांसाठी ठिकठिकाणी २४ तास पिण्याचे पाणी ठेवले जाते. सर्व जलसाठे कोरडे पडल्यावर पशू-पक्ष्यांना हे पिण्याचे पाणी संजीवनी ठरत आहे. पक्ष्यांसाठी थंडगार पाणी मिळावे म्हणून अनेक जण मातीची भांडी बनवून ती परसात व झाडांवर लावतात.
पालीतील डॉ. राऊत, पुई-सिद्धेश्वर येथील तरुण गणेश शिंदे व फणसवाडी येथील तरुण नीलेश शिंगरे हे मागील वर्षीपासून हा अनोखा उपक्रम राबवत आहेत. तसेच ग्रीन टच नर्सरीचे चालक अमित निंबाळकर यांनीही आपल्या नर्सरीमध्ये आणि घराजवळील झाडांवर पक्ष्यांसाठी घरटी बनवली आहेत. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही केली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात अनेक लोक उन्हाळ्यात पक्षांसाठी भूतदया दाखवीत आहेत.
दुकानाबाहेर हौद
जांभूळपाडा येथील पशू-पक्षीप्रेमी सचिन मजेठिया हे गेली अनेक वर्षे मोकाट जनावरे व पक्ष्यांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था करत आहेत. त्यासाठी दुकानाबाहेर छोटा हौद बनवून घेतला आहे. चिमणी, कावळे व इतर अनेक पक्षी त्यांच्या दुकानासमोर दाण्यापाण्यासाठी येतात. पाणी पितात आणि तेथे पाण्यात छान डुंबतात. अनेक कावळे तर त्यांच्या अंगाखांद्यावर खेळतात.
विणीच्या हंगामात पक्षी घरटी बांधण्यासाठी मानवी वसाहतीचा शोध घेत असतात. अशा पक्ष्यांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे यासाठी ही धडपड सुरू आहे. पर्यावरणस्नेही घरटी पाहून अनेक निसर्गप्रेमीही ती बनवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
- राम मुंढे, पक्षी अभ्यासक, विळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.