रायगडचा महसूल विभाग ठप्प; बेमुदत संपाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील (Raigad) महसूल विभागातील (Revenue department) अव्वल कारकून, महसूल सहायक व शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी (Pending demands) आंदोलनाची भूमिका तीव्र केली आहे. सोमवारी ४ एप्रिलपासून त्यांनी बेमुदत संप (indefinite strike) पुकारला आहे. या संपाला रायगड जिल्ह्यातून १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, या संपाचा फटका जिल्ह्यातील विद्यार्थी (impact on students) व सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. शैक्षणिक व अन्य कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या संपाचा परिणाम सर्वसामान्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महसूल सहायकांची पदे रिक्त असून, तातडीने भरण्यात यावी. भरतीबाबत कालमर्यादा ठरवून द्यावी. सुधारित निकषानुसार पदोन्नतीची तारीख सरकारने निश्चित करून देणे. आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, पदे मंजूर करणे. गृह विभागाच्या धर्तीवर महसूल कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तातडीने वर्ग तीन पदावर पदोन्नती देणे. पी.एम. किसान योजनेचे कामकाज पाहण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, त्यांची पदनिर्मिती करावी.
अशा अनेक मागण्यांसाठी अव्वल कारकून, महसूल सहायक व शिपाई असे एकूण सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, सहा उपविभागीय अधिकारी कार्यालये, १५ तहसील कार्यालये, दोन भूसंपादन कार्यालये व एक पनवेल येथील मेट्रो सेंटरमधील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत. या संपाला जिल्ह्यातून १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
गजबजणाऱ्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांविना शुकशुकाट पसरला आहे. उपविभागीय कार्यालयांसह तहसील कार्यालयात जातीचे, उत्पन्नाचे, शेतकरी, वय व अधिवास अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांसाठी सोमवारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना परतीचा मार्ग स्वीकारावा लागला. सध्या जिल्ह्यात पालखी, जयंती उत्सवांची धूम सुरू आहे. त्यासाठी लागणारे परवाने मिळवण्यासाठी ग्रामस्थांना तहसील कार्यालयात जावे लागत आहे. परंतु, संपामुळे दाखले मिळण्यास विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेवर दाखले न मिळाल्यास नागरिकांना उत्सव, पालखी, मिरवणूक व जयंती सोहळे साजरे करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
सोमवारपासून जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपकऱ्यांनी निदर्शने केली. या वेळी रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केतन भगत, सरचिटणीस भूषण पाटील, उपाध्यक्ष प्रफुल्ल कानिटकर, कार्याध्यक्ष गोवर्धन माने, वृषाली निमरे, दर्शना कांबळे, दर्शना पाटील, योजना पाटील आदी पदाधिकारी तसेच अव्वल कारकून, महसूल सहायक, शिपाई कर्मचारी उपस्थित होते. हे आंदोलन न्याय मिळेपर्यंत असणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थित संपकऱ्यांनी व्यक्त केली.
काळ्या फिती लावून कामकाज
प्रलंबित मागण्यांसाठी राज्यस्तरावर महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य या संपात सहभागी झाले आहेत. या संपाला पाठिंबा म्हणून पदोन्नती नायब तहसीलदार संघटनेकडून दर्शविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यालयात काळ्या फिती लावून कामकाज केले जात आहे. तसेच कोतवाल कर्मचारी संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे.
दाखल्याविना घरी
शेतकरी असल्याचा दाखला मिळावा, यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला आहे. दाखला आणण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयात आलो; परंतु कर्मचाऱ्यांचा संप असल्याने तो मिळाला नाही. त्यामुळे दाखला न घेताच परत घरी जाण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा एका दिव्यांग नागरिकाने मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.