मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे शतक पूर्ण
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा देदीप्यमान शतकी वारसा!
गौरवशाली प्रवासाची १०० वर्षें पूर्ण; देशाच्या सांस्कृतिक चळवळीसाठी मैलाचा दगड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : काळा घोडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने सोमवारी (ता. १०) आपल्या गौरवशाली प्रवासाची १०० वर्षें पूर्ण केली. संग्रहालयाच्या इतिहासातच नव्हे, तर देशाच्या सांस्कृतिक चळवळीसाठीही हा मैलाचा दगड ठरला आहे. १० जानेवारी १९२२ रोजी वस्तुसंग्रहालाची दारे जनतेसाठी खुली झाली होती. गांधार शैलीतील बुद्धमूर्तीची प्रतिकृती संग्रहालयाला पहिली भेट म्हणून देण्यात आली होती. त्यानंतर अनेक कलासंग्रह, जपानी व चिनी कलावस्तू, शस्त्रास्त्रे, वस्त्रे, लघुचित्रे आणि धातूच्या मूर्ती वस्तुसंग्रहालयाचा एक भाग होत गेल्या. वस्तुसंग्रहालयाचा शतकी वारसा आजही अनेकांसाठी माहितीचा खजिना ठरत आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गामुळे वस्तुसंग्रहालयाचे शताब्दी वर्ष साजरे करण्यावर निर्बंध असले तरी येत्या काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून अमूल्य ठेवा नव्याने जगासमोर येणार आहे.
१९०५ मध्ये संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे किंग जॉर्ज पंचम) यांनी केली. संग्रहालयाला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर २००१ मध्ये संग्रहालयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (सीएसएमव्हीएस) करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय एक स्वायत्त संस्था आहे. तिला सरकारी अनुदान मिळत नाही. ते संपूर्णपणे जनतेच्या व खासगी सहयोगाने चालवले जाते. धावत्या मुंबईत वस्तुसंग्रहालय असल्याने अनेक ठिकाणची महत्त्वाची माहिती येथून घेता येते. संग्रहालय केवळ कलाकृतींचे भांडार नसून ते संशोधन आणि शिक्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे कला इतिहास आणि पुरातत्त्व क्षेत्रातील ज्येष्ठांबरोबरच तरुणांना माहितीचे महाजाल उपलब्ध झाले आहे.
-----------------------------------
सर्वोच्च रेटिंग
‘सीएसएमव्हीएस’ जागतिक संस्था असून पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक आहे. त्यामुळेच भारतीय ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) कडून विद्यमान इमारत श्रेणीअंतर्गत वस्तुसंग्रहालयाला सर्वोच्च प्लॅटिनम रेटिंग मिळाले आहे. सौरऊर्जेचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी लायटिंग, विना-प्लास्टिक धोरण आणि कचरा व्यवस्थापनावर भर दिला जात आहे.
-----------------------------------
कोट
वस्तुसंग्रहालय केवळ कला आणि पुरातन वस्तूंचे भांडार नसून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारे संस्कृती अन् शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. ते एक सांस्कृतिक आणि एक सामाजिक ठिकाण आहे. समुदायांसाठी संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठही आहे. जसजसे संग्रहालय विकसित होत आहे आणि त्याची लोकप्रियता वाढत आहे तसतशी शहरात राहणाऱ्या विविध समुदायांच्या प्रती त्याची जबाबदारी अधिक वाढते.
- सब्यसाची मुखर्जी, महासंचालक, सीएसएमव्हीएस.
-----------------------------------
आधुनिक आणि समकालीन मिलाफ
गेल्या शतकात संग्रहालयात सुमारे ७० हजार वस्तूंचा समावेश झाला आहे. ज्यात विशेषत: भारतीय उपखंडातील अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते वर्तमानापर्यंतच्या मानवी कथा सांगितल्या आहेत. खासगी संग्राहकांनी दिलेल्या अनेक संग्रहांनी संग्रहालयाचे भांडार मोठ्या प्रमाणात समृद्ध झाले आहे. संग्रहामध्ये सर अकबर हैदरी, अल्मा लतिफी, अमरावती गुप्ता, कार्ल खंडालावाला, वीणा श्रॉफ, डॉ. फेरोजा गोदरेज आणि पॉलीन रोहतगी, अर्न्स्ट आणि मिशा जेनकेल आणि कुलदीप सिंग यांच्याकडून मिळालेल्या सुंदर भेटवस्तूंचा समावेश आहे. समकालीन कलाप्रेमींच्या गरजा पूर्ण करत, जहांगीर निकोल्सन यांचा भारतातील आधुनिक आणि समकालीन कलांचा संग्रहही संग्रहालय परिसरात ठेवण्यात आला आहे. सध्या संग्रहालयाकडे तो १५ वर्षांच्या कर्जावर आहे. त्याने संग्रहालयाच्या संग्रहात आधुनिक आणि समकालीन मिलाफ घडवून आणला आहे.
-----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.