वीटभट्टीवरील मुले गिरवतात झाडाखाली धडे, अंबरनाथमधील शाळेची सर्वत्र चर्चा

अंबरनाथमध्ये मजुरांच्या मुलांसाठी भरते अनोखी शाळा
Students in ambarnath
Students in ambarnathsakal media
Published on

अंबरनाथ : कोरोना संसर्गाचा (corona infection) धोका लक्षात घेऊन मागील दीड-पावणेदोन वर्षापासून मुलांच्या शाळा बंद आहेत. मध्यंतरी शाळा सुरूही झाल्या, परंतु तिसऱ्या लाटेने पुन्हा ऑनलाईन शिक्षण (online education) सुरू आहे. त्यातही अंबरनाथमध्ये (Ambarnath) मागील वर्षभरापासून एका वडाच्या झाडाखाली भरणारी अनोखी शाळा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुले नसून, वीटभट्टीवरील मजुरांची मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मोकळ्या निसर्गरम्य वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवताना मुलांमध्येही उत्साह दिसून येत आहे. ( Students do study sitting near banyan tree in ambarnath)

Students in ambarnath
वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे संकेत

अंबरनाथ आणि बदलापूर तसेच परिसरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते. आठ महिने वीटभट्टीवर काम करण्यासाठी विविध भागांतून मोठ्या संख्येने मजूर येतात. काम झाल्यानंतर पावसाळ्यात ते पुन्हा आपापल्या गावाकडे जातात. या कालावधीत मुलांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन ‘द युवा युनिटी फाऊंडेशन’चे अध्यक्ष योगेश चलवादी यांनी या मुलांसाठी अध्यापनाचे कार्य सुरू केले. बदलापूरजवळ मूळगाव येथील वीटभट्टीवर वडाच्या झाडाखाली ही अनोखी शाळा सुरू करण्यात आली.

मुले मोकळ्या निसर्गरम्य वातावरणात कोरोनाच्या नियमांचे पालन करूत ग म भ न आणि ए, बी, सी डीपासून कार्यानुभवाचे धडे गिरवत आहेत. २० मुलांपासून सुरुवात केलेल्या या शाळेचा विस्तार बदलापुरातील मूळगाव येथे एक आणि अंबरनाथमध्ये दोन अशा तीन ठिकाणी झाला आहे. या शाळांमध्ये बालवर्गापासून नववीपर्यंत ७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आठवड्यातून दोन वेळा ही शाळा भरते. मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या शाळेमध्ये मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

व्यवसाय, नोकरी सांभाळून अध्यापन योगेश चलवादी यांच्यासह सागर माने, आदित्य नीलकंठ, अमन विश्वकर्मा, रोहित कुंभार, साईमा शेख, सिद्देश माईन, अंकिता ठोकळ, सायली देशमुख, नूर शेख, ज्योती चलवादी, मेघा वाल्मीकी आणि इंदिरा हे सगळे उच्चशिक्षित सदस्य त्यांचा त्यांचा व्यवसाय, नोकरी सांभाळून झाडाखाली भरणाऱ्या शाळेत मुलांना गणित, इंग्रजी, चित्रकला आणि कार्यानुभव विषय शिकवत आहेत. अलीकडेच या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे संस्थेचे उद्दिष्ट असून येत्या २६ जानेवारीपर्यंत झाडाखालील १० शाळा सुरू करण्याचा निर्धार आहे. फाऊंडेशनच्या सगळ्या सदस्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय दर १५ दिवसांनी प्रत्येकाची कोविड चाचणी केली जाते. प्रत्येक शाळेत चार जण विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतात. - योगेश चलवादी, अध्यक्ष, द युवा युनिटी फाऊंडेशन, अंबरनाथ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.