नवी मुंबई : धार्मिक मतांवर राजकीय पक्षांचा डोळा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत विविध समाजांची धार्मिक मते आपल्या पदरात पाडण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दुसऱ्या उद्घाटनानंतर स्मारकाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यादरम्यान शहरात गुरूनानक यांचे स्मारक उभारणार असल्याचे आश्वासन माजीमंत्री आणि आमदार गणेश नाईक यांनी दिले आहे.
आगरी-कोळी समाजाचे प्राबल्य असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ३० गावांपासून नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली. काही गावांत आदिवासी आणि दलित कुटुंबे सोडली तर नंतरच्या काळात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खान्देश या भागातून शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय या निमित्ताने आलेले नागरिक नवी मुंबईत राहतात. विविध जिल्ह्यांसोबतच देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकही नवी मुंबईत वास्तव्याला आहेत.
याच नवी मुंबईत ऐरोली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना साजेसे असे स्मारक उभारण्यात येत आहे. तब्बल दहा वर्षे रखडलेल्या या स्मारकाचे काम आता मार्गी लागले आहे. हे काम आपल्या कारकिर्दीत झाल्याचा शिवसेना आणि काँग्रेसने दावा केला आहे. नवी मुंबईतील विविध नोडमध्ये राहत असणाऱ्या आंबेडकरी समाजाच्या मतांचा या पक्षांच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. याआधी विधानसभा निवडणुकीवेळेस आमदार मंदा म्हात्रे यांनी नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या उद्यानात तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जागा पाहणी करून मंदा म्हात्रे यांनी विविध परवानग्या आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या थांबलेल्या आंदोलनात पुन्हा आग ओतली. गावोगावी बैठका घेऊन हे आंदोलन धगधगते ठेवण्याचा स्थानिक नेतृत्वांचा प्रयत्न आहे. असे झाल्यास स्थानिक आगरी-कोळी मते मिळवण्यास भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान गणेश नाईक यांनी शिख समुदायाचे गुरूनानक यांचे स्मारक उभारण्याची केलेली घोषणा शिख समुदायाला सुखावणारी आहे. ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, सीबीडी-बेलापूर या भागात राहत असल्याने त्यांच्या मताचा टक्का आपल्याकडे वळवण्यासाठी फायदा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.