ठाणे : दहशतवादी हल्ल्याच्या ई-मेलचा छडा नाहीच! रहस्य गुलदस्त्यातच
ठाणे : मोठमोठ्या गुन्ह्यांचा तपास लावणाऱ्या ठाणे पोलिसांना (Thane Police) एक महिन्यापूर्वी शाळेला आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या (Terrorist Attack) धमकीच्या ई-मेलचा (Threat email) छडा लावण्यात अद्याप यश आलेले नाही. हा ई-मेल परदेशातील सर्व्हरमधून आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा ‘आयपी अॅड्रेस’ (IP Address) मिळवण्यात अडचण येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ठाणे पोलिस शाळेत २३ जानेवारीला राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली. या परीक्षेच्या आदल्या रात्री शाळेची पाहणी केल्यानंतर एका शिक्षिकेने शाळेचा ई-मेल तपासला असता त्यावर ‘लष्कर-२९ लष्कर अॅट दि रेटप्रोटोनमेल डॉट कॉम’ या ई-मेलवरून ‘मिशन २२’ असे अधोरेखित असलेला एक संदेश आला होता. त्या शिक्षिकेने तो ई-मेल उघडला असता ‘मैं जावेद खान लष्कर- २९ का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हूँ... हमारा एकही मकसद है, पुरे हिंदुस्थान में जिहाद का पालन हो... तभी हमारा देश प्रगती करेगा’ या आशयाचा मजकूर लिहिला होता.
हा ई-मेल पाहताच शिक्षिकेने या घटनेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांना दिल्यानंतर ठाणेनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या ई-मेलमध्ये डोंबिवलीतील काही नागरिकांची नावे लिहिली होती. या प्रकरणाचा तपास ठाणे नगर पोलिस सायबर सेलच्या मदतीने करत आहेत; मात्र या घटनेला एक महिना उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच आलेले नाही.
गृह विभागाशी पत्रव्यवहार
शाळेला आलेला दहशतवादी हल्ल्याचा ई-मेल भारताबाहेरून पाठवण्यात आल्याचा संशय आहे. देशाबाहेरील सर्व्हर असल्याने त्याची माहिती काढण्यासाठी आयपी अॅड्रेसची आवश्यकता आहे. तो आयपी अॅड्रेस मिळवण्यासाठी केंद्रीय गृह विभागाच्या परवानगीची आवश्यकता असते. संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार झाला आहे. त्यांच्याकडून परवानगी, माहिती मिळताच पुढील कार्यवाही होऊ शकते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
डोंबिवली कनेक्शन बोगस
दशहतवादी ई-मेलमध्ये डोंबिवलीतील काही नागरिकांची नावे होती. त्यानुसार पोलिसांनी त्या त्या परिसरात छापे मारून त्यांना शोधून काढले, पण त्यांचा तपास केला असता त्यांचा या ई-मेलशी किंवा दशहतवादी संघटनेशी कोणताच संबंध नसल्याचे उघड झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.