कनेक्टिंग डॉट्स : महामारीसोबत जगणे शिकायला हवे!
कोविडचा त्रास (corona infection) जवळपास प्रत्येक नागरिकाला झाला, पण सर्वाधिक त्रास झाला तो आरोग्य कर्मचाऱ्यांना. कारण गेली दोन वर्षे आरोग्य कर्मचारी (Health Authorities) रात्रंदिवस कोरोना रुग्णांच्या सेवेत होते. कोरोनापासून संरक्षणासाठी नागरिकांनी जबाबदारी ही घेतलीच पाहिजे. त्यासाठी कोविड नियमांचे पालन (corona rules) करणे तसेच प्राधान्याने लसीकरण करून घेतले पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोविड महामारीसोबत जगणे शिकले पाहिजे. जेणेकरून कोरोनाच्या पुढील लाटांशी (corona waves) आपल्याला दोन हात करता येतील, असा सल्ला बीकेसी जम्बो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिला.
कोरोनाच्या तिन्ही लाटांवेळी बीकेसी जम्बो कोविड केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या लाटेवेळी आरोग्य सेवा मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी बीकेसी कोविड केंद्राची उभारणी केली होती. पहिली लाट ही वेगळीच होती. महत्त्वाचे म्हणजे ट्रान्झिट रुग्णालय कसे असते, ते कसे चालवतात, हे कोणालाच माहिती नव्हते. शिवाय मार्गदर्शनही कोणाचे घेणार, हा मुख्य मुद्दा होता. हे कोविड केंद्र चालवण्यासाठी माझ्यासोबतच्या टीमला तारेवरची कसरत करावी लागली. कोविड केंद्रात ऑक्सिजन, आयसीयू खाटांची सुविधा उपलब्ध करणे, हे सर्वांत महत्त्वाचे होते.
पहिल्या लाटेमध्ये एप्रिल-मे महिन्यात मुंबईतील बहुतांश रुग्णालयांतील खाटा भरल्या होत्या. त्यातच बीकेसी कोविड केंद्र उभारल्याने रुग्णसेवेला मोठा हातभार लावता आला. केवळ कोविड केंद्र उभे राहिल्याने प्रश्न सुटणार नव्हता, त्यासाठी लागणारे मनुष्यबळही तेवढेच सक्षम हवे होते, पण आमच्याकडे केवळ सायन रुग्णालयातील काही कनिष्ठ डॉक्टर्स सेवेत होते. आम्हालाच स्वत:चे डॉक्टर्स नियुक्त करावे लागले. बीएएमएस किंवा बीएचएमएस अशा एकूण ४०३६ डॉक्टरांची नियुक्ती केली. डॉक्टरांना कितीही पगार दिला, तरी ते वॉर्डात काम करायला तयार नव्हते. कारण त्यांना स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबीयांचीही भीती होती.
सर्व डॉक्टरांमध्ये ७० टक्के डॉक्टर बीएएमएस, बीएचएमएस होते आणि केवळ २० ते २२ टक्के डॉक्टर एमबीबीएस होते. बीएएमएस डॉक्टरांनी कधीच वॉर्डात काम नव्हते केले. त्यांच्याकडून महामारीच्या काळात काम करून घेणे, त्यांना शिकवणे आणि रुग्ण जगवणे हे कौशल्याचे काम होते. प्रशिक्षित परिचारिकाही कधी उपलब्ध झाल्या नाहीत. आठवड्यातून तीन वेळा त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी दररोज १५० ते २०० रुग्ण दाखल होत असत. त्यापैकी पाच ते १० टक्के गंभीर होते. त्यामुळे एकावेळी एक डॉक्टर ६० रुग्णांचा वॉर्ड सांभाळत होता. आयसीएमआरच्या नियमानुसार १० रुग्णांमागे एक डॉक्टर असा नियम आहे, पण महामारीत एवढे डॉक्टर्स उपलब्ध करणे शक्य नव्हते. त्यातून आम्ही बीकेसी केंद्रात क्रायसिस मॅनेजमेंट एसओपी तयार केला. तो यशस्वी झाल्यामुळे तो सगळीकडे लागू करण्यात आला. त्यामुळे पहिले १० हजार रुग्ण डिस्चार्ज होईपर्यंत एकाही कोविड रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
सर्व काही सुरळित सुरू असताना काही अडचणीही आल्या. बीकेसी परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या अडचणी होत्या. तसेच निसर्ग चक्रीवादळावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रात्रभरात २४८ रुग्ण बीकेसी कोविड केंद्रातून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान, पहिल्या लाटेवेळी पावसाळ्यात जे. जे., सायन रुग्णालयामत पाणी भरले होते, पण बीकेसी केंद्रातील उपाययोजनांमुळे तेथे कोणतीही अडचण आली नाही. निसर्ग चक्रीवादळ शांत होताच आम्ही पुन्हा कार्यरत झालो.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी जास्त असल्याने एनसीसी म्हणजेच नर्सिंग, केअर आणि कम्युनिकेशनचा अभाव पाहायला मिळतो. त्यामुळे रुग्णांना काही अडचणींना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेता बीकेसी केंद्रात आम्ही त्यावर अधिक भर दिला. प्रसंगी आम्ही खासगी रुग्णालयांपेक्षाही चांगली सुविधा दिली. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. वॉर रूममधील हेल्पलाईनच्या माध्यमातून नातेवाईकांना आपल्या रुग्णाविषयी सर्व माहिती दिली जात होती. रोबोच्या मदतीने रुग्णांना औषधे, जेवण पोहोचवले गेले.
आतापर्यंत बीकेसी कोविड केंद्रातून ३० हजारांहून अधिक रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तसेच येथील मृत्यूदर अजूनही तीन टक्क्यांच्या पुढे गेला नाही. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढली. दुसऱ्या लाटेत पहिल्या दिवशी केवळ ८६ रुग्ण होते. बघता बघता ११ व्या दिवशी रुग्णसंख्या हजारावर गेली. पहिली लाट ओसरल्याने मनुष्यबळ कमी केले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेत पुन्हा मनुष्यबळाची कमतरता जाणवली. त्यामुळे डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांनी दोन ते तीन पाळ्यांमध्ये काम केले. जेवणाची सुविधा २४ तास सुरू ठेवली. ऑक्सिजन आणि खाटांचे व्यवस्थापन चांगल्या पद्घतीने केल्यामुळे कोविड परिस्थिती नियंत्रणात राहिली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव तिसऱ्या लाटेसाठी उपयोगी पडल्याने तिसऱ्या लाटेला तोंड देण्यास फारशा अडचणी आल्या नाहीत.
लसीकरण अत्यंत महत्त्वाचे
लसीकरणाचा दुसऱ्या लाटेत फायदा झाला नाही, कारण त्या वेळी अनेकांचा दुसरा डोस बाकी होता. परंतु तिसऱ्या लाटेवेळी म्हणजे आता लसीकरणाचा फायदा झाल्याचे चित्र आहे. सध्या ज्यांचा दुसरा डोस झालेला नाही, असेच रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. प्रत्येकाने वेळीच लस घेतली असती, तर ऑक्सिजनवर असणाऱ्यांची संख्या आता कमी असती.
नागरिकांनी काय केले पाहिजे?
प्रशासन, सरकार, पालिका आम्ही सर्व आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. एक नागरिक म्हणून जाण ठेवली पाहिजे. ५ ते १० टक्के नागरिक आहेत, जे बाजारात जाताना मास्क घालत नाहीत किंवा लस घेणे टाळतात, यातून संसर्ग वाढतो. त्यामुळे नागरिकांनी लस घेणे आणि यापुढे कोविड महामारीसोबत जगणे शिकायला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.