Nandivali water supply
Nandivali water supplysakal media

डोंबिवली : नांदिवलीत पाण्याची पळवापळवी! इतर भागांचा पाणीपुरवठा विस्कळित

Published on

डोंबिवली : डोंबिवलीतील नांदिवली टेकडी परिसरातील पाणीटंचाईच्या (water scarcity in nandivali) समस्येचे निराकरण अवघ्या सात दिवसांत करत महापालिकेने (kdmc) उच्च न्यायालयाकडून (high court) आपली पाठ थोपटून घेतली; मात्र टेकडी परिसराची तहान भागवण्यासाठी पालिकेने नांदिवली पाडा, नांदिवली मधला पाडा व मोहाची वाडी या तीन भागांतील पाणी पळवल्याची तक्रार ग्रामस्थ करतात. टेकडीवर पाणी आले, मात्र इतर (water supply problem) भागांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

Nandivali water supply
पनवेल : नऊवारी नेसून हिरकणींनी शिवगर्जना देत केला कर्नाळा किल्‍ला सर

टेकडीवर पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाण्याची तरतूद करणे आवश्यक होते; मात्र ती तरतूद करण्यात आलेली नाही. आधीच्या पाणी पुरवठ्यावरच टेकडीची तहान भागवण्यात आली आहे, परंतु याचा फटका इतर तीन भागांना बसत असून या भागांनाही पंपाद्वारे दोन तास पाणी दिले जावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नांदिवली गावात गेल्या काही वर्षांपासून पाण्याची वानवा आहे. पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने टेकडी परिसरातील नागरिकांनी उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती.

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सूचना महापालिकेला दिली होती. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांची बैठक पार पडली. या वेळी आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार पाणीपुरवठा विभाग डोंबिवलीचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांच्या पथकाने युद्धपातळीवर काम करीत अंदाजे १२०० मी. लांबीची २०० मी. व्यासाची नवीन वितरण वाहिनी एमआयडीसी टॅपिंग पॉइंट ते पिंपळेश्वर मंदिर येथील पाण्याच्या टाकीपर्यंत टाकून या टाकीतून ६० एचपीचा पंप बसवून या पंपाद्वारे टेकडीवर पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Nandivali water supply
ठाण्याला साथीच्या आजाराचा धोका; औषधफवारणी करण्याचे दिले आदेश

एमआयडीसीकडून एमएलडी फेज १ औद्योगिक विभाग, फेज २ निवासी विभाग, अनंतम, रिजन्सी, पलावा, रुणवाल या भागांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातूनच २७ गावांनादेखील पाणीपुरवठा केला जात आहे. ४० ते ४५ एमएलडी पाणी एमआयडीसी या भागाला देते; मात्र प्रत्यक्षात गावांना २५ ते ३० एमएलडी पाणी मिळत असून ते पुरेसे नाही. नांदिवली टेकडी हा परिसर उंचवट्यावर असल्याने पाण्याचा प्रेशर तिथपर्यंत पोहोचत नसल्याने या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. सध्या पिंपळेश्वर मंदिर येथील पाण्याच्या टाकीवरून पंपाद्वारे या भागाला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे करताना एमआयडीसीकडून वाढीव पाणी घेण्यात आले नाही, तर एकीकडचे पाणी दुसरीकडे वळवले आहे. यामुळे नांदिवली पाडा, नांदिवली मधला पाडा, मोहाचा पाडा या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. या भागातील पाण्याचा दाब कमी झाल्याने पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. नांदिवली मधला पाडा परिसरातील ग्रामस्थांनी त्यांनाही पिंपळेश्वर मंदिर येथील पंपाद्वारे दोन तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पाण्याच्या समस्येविषयी वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

पाणी मोजण्याची यंत्रणाच नाही

एमआयडीसीकडून तीन ते चार एमएलडी पाणी वाढवून मिळाल्यानंतरच येथील पाणी प्रश्न मिटेल, असे जाणकार ग्रामस्थ सांगतात. एमआयडीसी ४० ते ४५ एमएलडी पाणी देते, असा दावा करीत असले तरी महापालिकेकडे पाण्याचे मोजमाप करणारी यंत्रणाच नसल्याने किती एमएलडी पाणी पालिका वापरते याचीही नोंद पालिकेकडे नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.