मोबाईल टॉवर रेडिएशनचा आरोग्यावर दुष्परिणाम नाही
मुंबई : आपल्या परिसरातील सर्व मोबाईल टॉवर (Mobile tower) हे किरणोत्साराविषयीच्या दूरसंचार विभागाच्या (डॉट) नियमावलीचे पालन करतात. तसेच या टॉवरमधून उत्सर्जित होणाऱ्या कमी क्षमतेच्या नॉन-आयोनायझिंग किरणांचा (Non-ionizing radiation) मानवी आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम (No impact on human health) होत नसल्याची ग्वाही डॉटतर्फे आयोजित मुंबईत (mumbai) झालेल्या परिसंवादात तज्ज्ञांनी दिली.
वर्षभरात मुंबईतील १,४९३ टॉवरची तपासणी केली असता सर्व टॉवर हे किरणोत्साराविषयीच्या डॉटच्या नियमावलीचे पालन करत असल्याचे आढळून आले. तसेच त्यातून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचा माणसांवर दुष्परिणाम होत नाही, असे दिल्लीचे न्यूरोसर्जन विवेक टंडन यांनी या वेळी सांगितले. मोबाईल टॉवरमधून होणारे किरणोत्सर्जन व त्याच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत समजुती दूर करणे हा या परिसंवादाचा हेतू होता.
भारतामध्ये मोबाईल टॉवर किरणोत्सर्गाचे नियम हे इंटरनॅशनल कमिशन ऑन नॉन-आयोनायझिंग रेडिएशन प्रोटेक्शन (आयसीएनआयआरपी) च्या मर्यादेपेक्षा दहापट कठोर आहेत. तसेच जागतिक आऱोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेल्या शिफारशींचे पालन करणारे आहेत. त्यामुळे मोबाईल टॉवर रेडिएशनचा आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे डॉटचे वरिष्ठ अधिकारी अश्वनी सालवान म्हणाले. डब्ल्यूएचओने जगभरात प्रसिद्ध झालेल्या पंचवीस हजार लेखांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे, असे वरिष्ठ अधिकारी हौशिला प्रसाद म्हणाले.
सर्वांत कठोर नियम...
मोबाईल टॉवर्ससाठी उत्सर्जनाचे सर्वांत कठोर नियम बनविणाऱ्या जगातील काही मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. डॉटकडून देशभरातील टॉवर्समधून होणाऱ्या उत्सर्जनाची पातळी सातत्याने तपासली जाते व उत्सर्जनविषयक नियमांचे पालन केले जाईल याची खबरदारी घेतली जाते. तसेच ही खबरदारी घेणे सर्व सेवापुरवठादारांसाठी अनिवार्य आहे. टॉवरच्या जागांचे प्रत्यक्ष परीक्षणही केले जाते. हे परीक्षण करण्यासाठी टॉवर्सची अनियत क्रमाने निवड केली जाते, असे संचालक एम. के. जैन यांनी दाखवून दिले.
विरोधाला पुरावा नाही!
दिल्लीच्या एम्समधील ज्येष्ठ न्यूरोसर्जन विवेक टंडन यांनीही या मतांना पुष्टी दिली. मोबाईल टॉवर अँटेना आणि हँडसेटमधून उत्सर्जित होणारे किरण म्हणजे कमी क्षमतेची विद्युतचुंबकीय ऊर्जा असते. त्याचे मानवी आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मोबाईल टॉवर्सच्या विरोधातील मतांना दुजोरा देणारा कोणताही वैज्ञानिक किंवा वैद्यकीय पुरावा नाही, असेही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.