भिवंडीत पाणीटंचाईचे चटके तीव्र; राजकीय नेत्यांचा आंदोलनाचा इशारा
भिवंडी : उन्हाचे तीव्र चटके बसण्यास सुरुवात झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके (water scarcity) बसण्यास सुरुवात होते, परंतु शहरी भागातही या टंचाईची झळ बसत असून, भिवंडी पालिका (bhiwandi municipal corporation) हद्दीतील नागरिक सध्या याच समस्येने हैराण आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. एकीकडे टंचाईचे चटके बसत असताना, दुसरीकडे स्टेम प्राधिकरणाने जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी (water pipe line repairing) बुधवार आणि गुरुवार (ता. ३१) पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
यंत्रमाग कारखाने, गोदाम पट्टा यामुळे शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी शहरात नेहमीच पाणीटंचाई भासते. भिवंडी शहराला मुंबई महापालिकेप्रमाणेच स्टेम प्राधिकरणाकडूनही पाणीपुरवठा होतो; मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे हा पाणीपुरवठा कमी पडतो. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून योग्य नियोजन केले जात नसल्याने अनेकांना मुबलक पाणी मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते.
मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना दिवसा वेळेत मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असताना भिवंडीत न्यायालयीन आदेशाचा अवमान होत आहे. कारण अनेक ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास; तर अनेक ठिकाणी पहाटे ३-४ च्या सुमारास पाणी येते. परिणामी नागरिकांना रात्रभर जागता पहारा द्यावा लागतो.
गेल्या महिनाभरापासून शहरातील शांतिनगर, गैबीनगर, पिरागी पाडा, नागाव, गायत्री नगर, पारनाका बाजारपेठ, वाणी आळी, सौदागर मोडला थांब जाळी, कासार, ब्राह्मण आळी, दर्गा रोड, र्इदगाह रोड, नारपोली अशा विविध भागांत पिण्याचे पाणी मिळवताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात पाण्याचे टँकरही सुरू केले आहेत; मात्र नियोजन नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावेच लागते. त्यामुळे या समस्येवर मात करून, मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी होऊ लागली आहे.
आंदोलनाचा इशारा
अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत महापालिका अधिकारी वर्गाकडे नागरिकांनी तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आधीच टंचाई असताना, जलवाहिनी दुरुस्तीसाठी पुन्हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. याकडे आयुक्त प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक संतोष शेट्टी, शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांनी दिला आहे.
पुन्हा पाणीबाणी!
भिवंडी तालुक्यातील एमबीआर येथे स्टेमच्या जलवाहिनीवर पाणीगळती होत आहे. ही गळती काढण्याकरीता स्टेमकडून बुधवारी सकाळी ९ पासून ते गुरुवार (ता. ३१) सकाळी ९ पर्यंत २४ तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. याची नोंद घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.