मोखाडा : जल जीवन मीशन मीटवणार पाण्याचे 'टेन्शन'; महिलांची पायपीट थांबणार
मोखाडा : वर्षानुवर्षे पाणीटंचाईने होरपळणाऱ्या मोखाडा तालुक्याला सरकारच्या `जल जीवन मिशन` योजनेमुळे (Jal jeevan mission yojana) पाणीदार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात मोखाड्यात १९ नळपाणीपुरवठा (water supply in mokhada) योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घराघरांत नळाद्वारे प्रतिव्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पाणीटंचाईने (water scarcity) होरपळणाऱ्या मोखाड्याचे जल जीवन मिशनमुळे पाण्याचे टेन्शन दूर होणार आहे.
पाण्यासाठीची बहुतांश गावपाड्यांतील महिलांची पायपीटही यामुळे थांबणार आहे. महाविकास आघाडी सरकारने पाणीटंचाईग्रस्त भागात जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणणे सुरू केले आहे. सदरच्या योजनेंतर्गत २०५३ पर्यंतची लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेऊन शाश्वत पाणी साठ्यावरून नळपाणीपुरवठा योजना आखल्या आहेत. प्रतिदिन प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी हा निकष त्यासाठी ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यात सर्वात भीषण पाणीटंचाई असलेल्या मोखाडा तालुक्यात पहिल्या टप्प्यात १९ नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मोखाड्यात जल जीवन मिशन योजनेंतर्गत गाव, वाडी आणि पाड्यांचा एकत्रित समाविष्ट करून घराघरांत नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी देण्यात येणार आहे.
मोखाड्यातील टंचाईग्रस्त २३ गावपाड्यांमधील नऊ हजार ८१७ घरांमध्ये नळजोडणी करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. वर्षभरात या योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. त्यामुळे मोखाड्यातील २३ गावपाड्यांमधील अनेक दशकांचे पाण्याचे दुष्टचक्र संपुष्टात येणार असून प्रत्येक कुटुंबाला धो-धो पाणी मिळणार आहे. दरम्यान, तालुक्यातील सूर्यमाळ आणि काष्टी या दोन योजनांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत; तर दुसऱ्या टप्प्यातील नळपाणीपुरवठा योजनांसाठी शाश्वत पाण्याचे सर्व्हेक्षण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुरू केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
सर्व नळपाणीपुरवठा योजना वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या १९ नळ योजनांमधील दोन नळपाणीपुरवठा योजनांचे कार्यादेश काढले असून उर्वरित योजना निविदास्तरावर आहेत; तर दुसऱ्या टप्प्यातील योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग करण्याची शक्यता आहे. काही योजना अप्पर आणि मध्य वैतरणा धरणातून करण्याचे नियोजन असून त्याबाबतच्या परवानगीची प्रक्रिया जीवन प्राधिकरणाने सुरू केली आहे.
- राजेश पाध्ये, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, जव्हार-मोखाडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.