रायगड : कुणबी समाज शिवसेनेपासून दुरावणार?समाजाची नाळ तुटण्याची शक्यता
अलिबाग : माणगाव येथे बुधवारी शिवसेनेचा (shivsena) कार्यकर्ता मेळावा झाला. माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते (Anant Geete) यांना त्याचे निमंत्रण नव्हते. या प्रकाराची रायगड (Raigad) जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली. गीते हे कुणबी समाजाचे (kunbi community) असून या समाजाची जिल्ह्यात तब्बल २० टक्क्यांपर्यंत मते असल्याने शिवसेनेबरोबर कुणबी समाजाची नाळ तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. कुणबी समाजाच्या काही स्थानिक नेत्यांनीही ही शक्यता व्यक्त केली आहे.
गीते हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते; तर दोन वेळा मंत्री होते. त्यामुळे त्यांचा रायगड लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे; पण बदलत्या राजकीय समीकरणात त्यांना शिवसेनेत स्थान दिसत नाही. पक्षाच्या बुधवारी झालेल्या मेळाव्याच्या बॅनरवरही त्यांचे छायाचित्र नव्हते. तसेच त्यांना वैयक्तिक निमंत्रणही नव्हते. त्यामुळे ते या कार्यक्रमाला हजार नव्हते.
ओबीसी जनमोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक उदय कटे यांनी सांगितले की, कुणबी समाजातील राजकीय नेतृत्व उभे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नेतृत्वाची ही कमतरता एका महिन्यात किंवा एका वर्षात भरून काढता येणार नाही. यासाठी संघटनात्मक आखणी करावी लागणार आहे. कुणबी समाज एकगठ्ठा मते देत असतो. त्यामुळे मोठ्या निवडणुकांमध्ये या समाजाचे वर्चस्व कायम दिसून आलेले आहे. यामुळे गीते रायगड आणि रत्नागिरी मतदारसंघातून सलग सहा वेळा खासदार झाले. मात्र, त्यांच्या बरोबरीने स्थानिक पातळीवर नेतृत्व तयार झाले नाही, अशी खंतही व्यक्त केली.
अनंत गीते यांच्याकडे कुणबी समाज फार अपेक्षेने पाहत होता; परंतु त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असाही मतप्रवाह या समाजातून व्यक्त केला जात आहे. शिवसेना आणि अनंत गीते हे समाजातील तरुणाच्या अनेक समस्या सोडवण्यात काही अंशी कमी पडले, अशी खंत कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांनी व्यक्त केली.
कुणबी समाजोन्नती संघ ही या समाजाची मातृ संस्था समजली जाते. या संस्थेचे वर्चस्व या गावोगावच्या समाज संघटनेवरही दिसून येते; मात्र शिवसेनेकडून मिळालेल्या दुजाभावामुळे ही संस्थादेखील शिवसेनेपासून दूर जात आहे, असेही सांगण्यात आले.
असे आहे समाजाचे वर्चस्व
रायगड मतदारसंघात साधारण २० टक्के मते ही कुणबी समाजातील आहेत. पेण, अलिबाग, सुधागड सोडल्यास इतर तालुक्यांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक मतदार आहेत. यातील बहुतांश मतदार मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी राहतात. मतदानासाठी हे मुंबईकर त्यांच्या मूळ गावात येतात. दापोली, गुहागर येथील मतांचीही यात भर पडते.
विधानसभा निवडणुकीनंतर नाराजी?
मागील लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पददेखील मिळाले. तेव्हापासून गीते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, असे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.