राज्यात दहा हजार कोटींची सोने खरेदी

राज्यात दहा हजार कोटींची सोने खरेदी

Published on

मुंबई, ता. २ ः कोरोनाचा फैलाव तसेच महिनाभराचे रशिया-युक्रेन युद्धाचे सावट मागे सारून आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी केली. राज्यभरात लग्न-साखरपुडा यांच्यासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांची दागिन्यांची उलाढाल झाली असा अंदाज आहे. आज लग्नसराईसाठी हलक्या वजनाच्या पण आकर्षक अशा नव्या ट्रेंडच्या दागिन्यांची मोठी खरेदी झाली.

दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे दणकेबाज विवाहसोहळेच झाले नाहीत व त्यामुळे दागिने घेता आले नाहीत अशी परिस्थिती होती. कोरोना निर्बंध उठल्याने लोकांनी मनसोक्त खरेदी केल्याचे चित्र आज दिसले. एप्रिल ते जूनदरम्यान मोठ्या संख्येने असलेल्या विवाह मुहूर्तांसाठी महिलांनी खरेदीही केली. तसेच दागिन्यांच्या मागण्याही नोंदवून ठेवल्या. त्यामुळे आज वळी, बिस्किटे, नाणी याहीपेक्षा दागिन्यांची मागणी किंवा खरेदी झाली. पाडव्याला मुंबईत तीन टन; तर पुण्यात दीड टनांच्या आसपास दागिन्यांची खरेदी होते.

मागील महिन्यात लोकांनी फार मागण्या नोंदवल्या नसल्याने आज तात्काळ खरेदीसाठी गर्दी झाली. विवाह समारंभासाठीचे दागिने व आजच्या मुहूर्ताचे छोटे दागिने असे खरेदीदारांचे दोन गट आज दिसल्याचे पीएनजी ज्वेलर्सच्या सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. सोने, चांदीचे दागिने आदी सर्वांना आज मागणी होती. त्यातही ८५ टक्के दागिने व १५ टक्के नाणी-वळे असा व्यवसाय झाला. राज्यभरात आज सुमारे १० ते १२ टन सोन्याची उलाढाल झाल्याचा अंदाज असल्याचेही गाडगीळ म्हणाले.

सोन्याचा दिवस
आज दोन वर्षांनी सर्वांसाठीच आनंदाचा दिवस होता, अशी प्रतिक्रिया पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर यांनी व्यक्त केली. येत्या लग्नसराईमुळे आज मंगळसूत्र व साखरपुड्यासाठी अंगठ्या यांना जास्त मागणी होती. सध्या सोन्याचे दर वाढले असल्याने वजनाने कमी असलेल्या दागिन्यांचा ट्रेंड आला असून त्याच्याही मागण्या नोंदवल्या गेल्या. आम्ही तीन महिन्यांपूर्वी आणलेल्या नववधूसाठीच्या आम्रपाली सेटमध्ये साखरपुड्याच्या दोन अंगठ्या, दोन बांगड्या, मंगळसूत्र, छोटा व मोठा नेकलेस, कर्णभूषणे हा सारा सेट १०० ग्रॅममध्ये बसवला जातो. पूर्वी हे सारे दागिने १० तोळ्यांत बसत नव्हते, पण आता नव्या तंत्रज्ञानाने ते शक्य झाले आहे. या आम्रपाली सेटलाही मोठा प्रतिसाद आहे, असेही पेडणेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.