Steroids
Steroidssakal

स्टिरॉईडमुळे ९३ टक्के रुग्णांचा घात

९३ टक्के रुग्णांना स्टिरॉईडचा अतिवापर आणि मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उपचार न दिल्यामुळे म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार झाला.
Published on
Summary

९३ टक्के रुग्णांना स्टिरॉईडचा अतिवापर आणि मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उपचार न दिल्यामुळे म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार झाला.

मुंबई - अंधेरीच्या मरोळ येथील पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाने (Seven Hills Hospital) कोविड-१९ (Covid-19) सह झालेल्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच काळ्या बुरशीची (Black Fungus) वैद्यकीय वैशिष्‍ट्ये समजून घेण्यासाठी अभ्यास (Study) केला. पालिकेने दिलेल्या त्या अहवालानुसार, ९३ टक्के रुग्णांचा स्टिरॉईडने (Steroids) घात केला. म्हणजेच जवळपास ९३ टक्के रुग्णांना स्टिरॉईडचा अतिवापर आणि मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उपचार न दिल्यामुळे म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार झाला.

एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२१ मध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांवर संशोधन करत अभ्यास करण्यात आला. हा अहवाल पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

म्युकरमायकोसिस हा एक गंभीर; परंतु दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे, जो म्युकरमायसीट्स नावाच्या समूहामुळे होतो. डॉक्टरांच्या मते, यामुळे अंधत्व येते, अवयव निकामी होतात, शरीराच्या ऊतींचे नुकसान होते आणि वेळीच उपचार न केल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो. कोविडनंतर बरे झालेल्यांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले होते.

३० रुग्णांवर अभ्यास

एकूण ३० रुग्णांवर हा अभ्यास केला गेला. यापैकी जवळपास २८ जणांवर म्हणजेच ९३.३४ टक्के रुग्णांना स्टिरॉईड देण्यात आले होते; तर फक्त दोघांवर उपचारांदरम्यान स्टिरॉईड्स देण्यात आले नव्हते. ज्यात ३४ ते ४० वयोगटातील ५ रुग्णांचा समावेश होता; तर ४१ ते ६० वयोगटातील ८ आणि ६१ ते ८० वयोगटातील १७ रुग्ण होते. यापैकी २३ पुरुष आणि ७ महिला होत्या. तसेच १६ जणांना सहव्याधी नव्हत्या; तर १४ जणांना सहव्याधी होत्या. तसेच मुंबईतील १७ जण आणि १३ जण हे इतर रुग्णालयांतून सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले गेले होते. या ३० रुग्णांपैकी १५ जणांवर म्युकरमायकोसिससंबंधित शस्त्रक्रिया केल्या गेल्या; तर १५ जणांना शस्त्रक्रियेची गरज पडली नाही.

जिथे सर्वाधिक स्टिरॉईड्सचा वापर...

सर्वांत महत्त्वाचे ९३ टक्के रुग्णांनी तोंडावाटे किंवा उपचारादरम्यान स्टिरॉईड थेरेपी घेतली होती. यासह सर्वाधिक रुग्ण हे इतर खासगी, निम्न खासगी, सरकारी रुग्णालयातून दाखल झाले होते. जिथे सर्वाधिक स्टिरॉईड्सचा वापर केला गेला होता, तेच रुग्ण नंतर गंभीर होऊन त्यांचा मृत्यूदेखील झाल्याची बाब अहवालातून स्पष्ट करण्यात आली आहे.

१० जणांनी गमावला जीव

कोविडनंतर म्युकरमायकोसिसने गंभीर झालेल्या अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागला. या अभ्यासात समावेश केला गेलेल्या ३० पैकी १० रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे जीव गेला आहे. यासह त्यांना इतर सहव्याधी जसे की, डायबिटीस, रिनल इंन्फेक्शन, हायपरटेंशन, थायरॉईड डिसॉर्डर आणि इतरांमुळे त्यांचा बचाव करणे शक्य झाले नाही. याचे प्रमाण ५३.३४ टक्के एवढे होते; तर २० रुग्ण म्युकर आणि कोविडमधून बाहेर पडून घरी गेले.

‘सेव्हन हिल्स’मध्ये प्रमाण कमी

सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी या अहवालाविषयी सांगितले की, या अहवालात समावेश असणारे १७ म्हणजेच सर्वाधिक रुग्ण मुंबईतील खासगी किंवा इतर सरकारी रुग्णालयातून उपचार घेऊन सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झाले होते. ज्यांच्यावर आधीच स्टिरॉईड्स आणि ऑक्सिजनचा वापर केला गेला होता; पण त्यानंतर त्यांच्यात म्युकरमायकोसिसचे निदान झाले.

- ७ रुग्ण हे थेट घरातून रुग्णालयात दाखल झाले होते. त्यातही त्यांना ऑक्सिजन थेरेपी किंवा स्टिरॉईड्स दिल्यामुळे त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला.

- सर्वाधिक रुग्ण उशिरा दाखल झाल्यामुळेही त्यांना म्युकरचा धोका निर्माण झाला. शिवाय ज्या रुग्णांनी खासगी रुग्णालयात किंवा इतर खासगी सल्ला घेऊन किंवा अधिक वेळ आयसीयूत दाखल असल्यानेही म्युकरचा त्रास झाला होता.

- सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारानंतर म्युकरमायकोसिस होण्याचे प्रमाण तुलनेने फार कमी होते. कारण सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच स्टिरॉईड्स आणि ऑक्सिजन थेरेपीचा इथे वापर करण्यात आला.

अहवालानुसार, सर्वाधिक रुग्ण हे मुंबईबाहेरील होते, ज्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार दिले गेले. योग्य वेळेवर निदान आणि उपचारांमुळे आम्हाला हा आजार नियंत्रित करण्यास मदत झाली.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

१० हजार रुग्ण...

दुसऱ्या लाटेदरम्यान, कोविड-१९ ची प्रकरणे दुप्पट झाल्यामुळे, म्युकरमायकोसिसचे जवळपास १० हजार रुग्ण आढळून आले. टोसिलिझुमॅब आणि स्टिरॉइड्ससारख्या औषधांच्या अनियंत्रित वापराला डॉक्टरांनी यासाठी कारणीभूत ठरवले आहे. स्टिरॉइड्स कोविड-१९ संक्रमित रुग्णांच्या फुप्फुसातील जळजळ कमी करतात; पण त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही कमी होते. त्यामुळे ते जेव्हा म्युकरच्या विषाणूंच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांना काळ्या बुरशीचा धोका निर्माण होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.