panvel municipal corporation
panvel municipal corporationSakal

पनवेल पालिकेचे २०२२-२३ चे १४९९ कोटींचे अंदाजपत्रक

स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत पनवेल महापालिकेचे २०२२-२३ चे १४९९ कोटींचे अंदाजपत्रकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.
Published on
Summary

स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत पनवेल महापालिकेचे २०२२-२३ चे १४९९ कोटींचे अंदाजपत्रकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.

पनवेल - स्थायी समितीच्या (Standing Committee) सोमवारी (ता. १८) झालेल्या विशेष सभेत पनवेल महापालिकेचे (Panvel Municipal) २०२२-२३ चे १४९९ कोटींचे अंदाजपत्रकाला (Budget) बहुमताने मंजुरी देण्यात आली. या वेळी बांधकाम विभागाच्या कामासाठी ३२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात पालिकेची प्रशासकीय इमारतीसह महापौर निवासस्थान, प्रभाग कार्यालय, सामाजिक केंद्र, तलाव सुशोभीकरण, सिडको हस्तांतरण, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे आदींचा समावेश आहे. मालमत्ता कराने सभा पुन्हा एका गाजली. या वेळी मालमत्ता कर कमी करण्याची मागणी मान्य न केल्याने विरोधकांनी सभात्यागही केला.

महापालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (ता. १८) महापालिकेची अर्थसंकल्पीय स्थायी समिती विशेष सभा सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ऑफलाईन घेण्यात आली. या सभेत पालिकेचे २०२२-२३ चे १४९९ कोटींच्या अंदाजपत्रकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. कोणतीही दरवाढ, करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकात महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात बांधकाम विभागाच्या विविध पायाभूत कामांसाठी ३२६ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. गावठाण पायाभूत सोयी सुविधा ६२ कोटी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे १० कोटी, स्वराज्य या महापालिकेच्या प्रशासकीय इमारत ४० कोटी, महापौर निवासस्थानासाठी १२ कोटी, प्रभाग कार्यालये बांधकाम १२ कोटी, माता रमाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणे ५ कोटी, तलाव सुशोभीकरण १४ कोटी, सिडको भूखंड हस्तांतरण आणि विकास ४० कोटी अशी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ, विविध वाहने खरेदी करणे, जेटिंग मशीन खरेदी करण्यासाठी ७५ कोटी राखीव ठेवण्यात आले आहे. पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुर्नविकास योजना राबवण्यासाठी २०५ कोटींचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे. या वेळी स्थायी समितीचे सदस्य प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, दर्शना भोईर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, गणेश कडू, अरविंद म्हात्रे, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे, लेखापरीक्षक विनयकुमार पाटील, नगरसचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व इतर उपस्थित होते.

बांधकाम क्षेत्रातील पायाभूत कामे

  • एकूण निधी … ३२६ कोटी

  • गावठाणासाठी … ६२ कोटी

  • शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र … १० कोटी

  • स्वराज्य पालिकेची प्रशासकीय इमारत … ४० कोटी

  • महापौर निवास … १२ कोटी

  • प्रभाग कार्यालये … १२ कोटी

  • माता रमाई आंबेडकर सामाजिक केंद्र … ५ कोटी

  • तलाव सुशोभीकरण … १४ कोटी

  • सिडको भूखंड हस्तांतरण आणि विकास … ४० कोटी

अद्ययावत वाहने खरेदी करणार

पनवेल महापालिका क्षेत्रात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन विभाग अद्ययावत करण्यासाठी २१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात अंतर्गत विविध सुविधांनी युक्त अद्ययावत वाहने खरेदी करण्यात येणार आहे.

शिक्षणासाठी

इंग्रजी माध्यम शाळा, शाळेच्या इमारती, ई-लर्निंग अंतर्गत संगणक प्रशिक्षण सेवा या सर्वांसाठी २१ कोटींच्या निधीची तरतूद महापालिकेने केली आहे.

महिला सक्षमीकरणासाठी

महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवण्यासाठी २.५२ कोटीचा निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

दिव्यागांसाठी

दिव्यांगाचे पुनर्वसन करणे त्यांना उपयुक्त योजना राबवणे, आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने ५.२६ कोटींची भरीव निधी देण्यात आला आहे.

पर्यावरणासाठी सव्वा कोटी

पनवेल महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी आयआयटीसारख्या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. हवेतील प्रदूषणाची मात्रा मोजण्यासाठी मशीन्स महापालिका क्षेत्रात बसविण्यासाठी १.३० कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

विरोधकांचा सभात्याग

सभेच्या सुरुवातीलाचा विरोधकांनी मालमत्ता कर कमी करण्याबाबत मागणी केली. त्यावर चर्चा करण्यासाठी मतदान घेण्यात येऊन सात विरूद्ध पाच मतांनी ती फेटाळण्यात आल्यावर विरोधकांनी सभात्याग केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.