निसर्ग सौंदर्याने नटलेले कनकेश्वर मंदिर

निसर्ग सौंदर्याने नटलेले कनकेश्वर मंदिर

Published on

महेंद्र दुसार, अलिबाग
पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत, सुंदर निसर्गाच्या सानिध्यातील कनकेश्वर मंदिरात श्रावणमासात भाविकांची सतत वर्दळ असते. समुद्रसपाटीपासून जवळजवळ ३८५ मीटर उंच माथ्यावर शंकराचे मंदिर आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या मापगावातून सुमारे ७५० पायऱ्या चढून गेल्यावर येणारी निसर्ग सौंदर्याची अनुभूती थकवा नाहीसा करते. कोकणातील जांभ्या दगडात पारंपरिक पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून अलीकडे त्‍याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मुंबई-पुण्यातील पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी याठिकाणी आवर्जून येतात. वेड्यावाकड्या पायवाटेवर जांभा दगडात कोरलेल्या पायऱ्यांवरून चढताना अलिबाग परिसराचे विलोभनीय दृश्य दिसते. डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यानंतर दिसते ते पश्चिमाभिमुख कनकेश्वर मंदिर आणि त्याच्या मागील बाजूला असलेली दगडी अष्टकोनी पुष्करणी. पुष्करणीत मे महिन्यापर्यंत पाणी असते. रघुजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास दलाल यांनी कनकेश्वर मंदिराची पुष्करणी आणि पायऱ्यांचे काम स्वखर्चाने इसवी सन १७७४ जूनच्या सुमारास केल्याची नोंद आढळते. दगडी ब्रम्हकुंडाच्या अलीकडे पालेश्वर नावाचे छोटेसे शिवमंदिर आहे. या ठिकाणी श्री शंकराला फुले न वाहता केवळ बेल वाहिले जाते. एका आख्यायिकेनुसार, कनकासूर नावाच्या राक्षसाने महादेवाचा तप केला आणि वर म्हणून त्याच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली. हे द्वंद्व अनिर्णित राहिले. प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासूर दैत्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले. कनकासुराने डोंगरावर शंकर बरोबर वास्तव्य असावे, असा वर मागितला. शंकराने राक्षसाला पालथे पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कनकासूर भस्मसात होऊन त्याला मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.

रोप-वे करिता ५ कोटीचा निधी
भाविकांना मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढताना त्रास होतो त्‍यामुळे पर्यटन विभागाच्या माध्यमातून याठिकाणी रोप-वे ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्‍याची माहिती मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील थळे यांनी दिली.

फोटो समीर मालोदे यांच्याकडून येतील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.