mumbai goa highway nagothane flyover
mumbai goa highway nagothane flyoveresakal

Mumbai Goa Highway: डिसेंबरअखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण! सरकारचा दाव्यात किती तथ्य? वाचा परिस्थिती

Nagothane Flyover construction: नागोठणे उड्डाणपुलाच्‍या कामात विघ्न, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास किमान तीन वर्षे लागण्याची शक्‍यता
Published on

Nagothane Flyover Construction Causes 3-Year Delay Mumbai Goa Highway

अलिबाग, ता. २९ : मुंबई-गोवा महामार्गावर कायम वादग्रस्त ठरलेल्‍या कासू ते इंदापूर या ४२ किलोमीटरदरम्‍यान चालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या टप्प्यातील १२ किलोमीटरवर ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम केवळ १० टक्केच झाले आहे. सर्वात मोठा अडथळा असलेल्या १.२ किमी नागोठणे पुलाचे काम सुरू होऊन १२ वर्षे उलटली तरी जेमतेम १५ टक्केच झाले आहे. असे असताना राज्यातील नेतेमंडळी पुलाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याची घोषणा करीत आहेत.

एक ना अनेक समस्या समोर असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा दबाव टाकला जात आहे. कामाचा वेग, अतिक्रमण हटवण्यात येणारे अडथळे याचा विचार करता पुलाचे काम पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने कोकणातील चाकरमान्यांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे.

कासू ते इंदापूर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मे. कल्याण रोडवेज या कंपनीला दिले आहे. या कामासाठी ३४२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात काँक्रीटीकरणासह उड्डाणपूल, जनावरे, वाहनांसाठी भुयारी मार्गासह साईडपट्ट्या लावणे, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी अनेकदा डेडलाइन देण्यात आल्या. आता नव्याने डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यात नागोठणे उड्डाणपूल महत्त्वाचा अडथळा ठरत आहे. पुढील दोन महिन्यांत याचे काम करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे. ज्या पुलाचे काम १२ वर्षे वेग घेऊ शकले नाही, ते पुढील तीन महिन्यांत कसे करायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

नागोठण्याजवळ कामत हॉटेलपासून सुरू होणारा हा उड्डाणपूल इंद्रप्रस्थ हॉटेलजवळ संपतो. गणेशोत्‍सवादरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. पुलाच्या बाजूने तयार करण्यात आलेल्‍या तात्पुरत्‍या रस्‍त्‍यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. पेव्हर ब्लॉक टाकून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्‍न असला, तरी अवजड वाहतूक आणि सततच्या पावसामुळे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. अरुंद रस्ता, खड्ड्यामधून हेलकावणारी वाहने, पुलाच्या अपूर्ण संरक्षक भिंतीमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात येथे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यासाठी वाहतूक शाखेने काही सूचना करून धोकादायक ठिकाणी दुरुस्ती करण्याची विनंती महामार्ग प्राधिकरणास केली होती; परंतु गणेशोत्सवास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही यात फारशी सुधारणा झालेली दिसत नाही.

११ भुयारी मार्गाचे काम अपुरे

इंदापूरहून पनवेलच्या दिशेने येताना ११ ठिकाणी भुयारी मार्ग (व्हेईकल अंडरपास) तयार केले जात आहेत. त्याचे काम केवळ १० टक्केच झाले आहे. रातवड येथील रखडलेल्या पुलामुळे ७०० मीटरच्या रस्‍त्‍याची अक्षरशः दैना झाली आहे. त्यापुढे कोलाड येथील उड्डाणपुलाचे काम सुरूच झालेले नाही. धाटाव एमआयडीसी आणि रोहा शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी येथे उड्डाणपूल तयार केला जात आहे. त्यानंतर म्हैसदरा येथे गेल्‍या महिन्यात स्टीलचे गर्डर टाकण्यात आले आहेत.

खांब गावाजवळही अशीच स्थिती आहे. रस्‍त्‍याच्या दुतर्फा दुकाने असल्याने रस्ता अरुंद असल्‍याने सतत वाहतूक कोंडी होते. सुकेळी खिंडीतील डोंगर फोडून रस्ता एका समांतर रेषेत आणण्याचे काम सुरू आहे. सुकेळी खिंडीच्या पुढे अनधिकृतरीत्‍या सुरू असलेले हॉटेल हटवण्यात न आल्‍याने रस्‍त्‍याचे काम थांबल्‍याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

mumbai goa highway nagothane flyover
Mumbai Goa Highway: बेजबाबदार कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

१२ किमीचा रस्‍ता सर्वांत खराब

मुंबईपासून गोव्यापर्यंत सर्वांत खराब टप्पा म्हणून कासू ते इंदापूर या ४२ किमी अंतराच्या रस्त्याचा उल्लेख केला जातो. यातील ३० किलोमीटरचा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. उर्वरित १२ किमी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की, अवजड वाहने कलंडण्याचे प्रकार वारंवार घडतात. रस्‍त्‍यावर अनेक ठिकाणी खोदकाम केले आहे; तर काही ठिकाणी तीव्र वळणे आहेत. दिशादर्शक फलकाकडे दुर्लक्ष झाल्‍यास चालकांची मोठी फसगत होते. रस्ता चुकण्याचे प्रकार नव्या चालकांकडून हमखास होतात. वाहतूक कोंडी झाल्यावर त्यामधून मार्ग काढण्यास खूपच वेळ लागतो.

जुना आराखडा अडचणीचा

पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचा आराखडा तयार करताना वाहनांची संख्या कमी होती. आता लोकवस्ती वाढली आहे. महामार्गालगत पादचाऱ्यांसाठी नियोजित भुयारी मार्ग लहान होते. आता वाहनांचीही संख्या वाढल्याने हे भुयारी मार्ग गैरसोयीचे ठरत आहेत. ते बदलण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गावातील नागरिक सेवा रस्‍त्‍याची मागणी करीत आहेत. यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. त्याचबरोबर जुन्या आराखड्यानुसार कराव्या लागणाऱ्या भरावापेक्षा अधिकचा भराव करावा लागत असल्‍याने महामार्गालगतची शेतीतून पाण्याचा निचरा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

mumbai goa highway nagothane flyover
नागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस

मे. कल्याण रोडवेज कंपनीची ३४२ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली होती. या रकमेत ४२ किमीमधील सर्व कामे पूर्ण करावी लागतील. डिसेंबरपर्यंत प्राधान्याने रस्त्याचे काम केले जाणार आहे. काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत, न्यायालयाच्या आदेशामुळे ही अतिक्रमणे पावसाळ्यात काढू शकत नसल्याने काही दिवस वाट पाहावी लागेल. उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सेवा रस्‍त्‍याचे काम बाजूला ठेवून ही कामे केली जात आहेत.
- यशवंत घोटकर, संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

पंधरा वर्षांपासून आंदोलने करून वीट आला आहे. यास कंत्राटदार जितके जबाबदार आहेत, तितकेच लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत. निविदा प्रक्रियेतील पळवाटांचा कंत्राटदार गैरफायदा घेतात. भूसंपादन वेळेत न होणे, निधी न मिळणे, स्थानिकांचा विरोध अशी एक ना एक कारणे यापूर्वीच्या कंत्राटदारांनी दिली आहेत. आताही त्याच पद्धतीने काम केले जात आहे. यामुळे डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, यावर आमचा विश्वास नाही. यापूर्वीही अशी अनेक आश्वासने देण्यात आली होती.
- किशोर जैन, शिवसेना ठाकरे गट, नागोठणे

mumbai goa highway nagothane flyover
Kalyan Shilphata Traffic: ट्रॅफिक जाममुळे चक्क शाळेला सुट्टी? दुसऱ्यांदा ओढवली विद्यानिकेतनवर नामुष्की!

जुन्या आराखड्यानुसार मंजूर झालेली कामे अडचणीची ठरत आहेत. यात भुयारी मार्ग, उड्डाणपुलांचा समावेश आहे. बाकीच्या रस्त्याचे काम पूर्ण होत आलेले आहे. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला विशेषतः प्राधान्य देण्यात येत असून डिसेंबरपर्यंत ती कामे पूर्ण होतील. राहिला प्रश्न अतिक्रमणाचा. तर त्या नागरिकांनाही नोटिसा बजावल्‍या आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुकताच महामार्गाची पाहणी केली, त्यांनी काही सूचना केल्‍यानुसार काम सुरू आहे.
- आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...