नैसर्गिक आपत्ती घाटरस्त्यांच्या मुळावर

नैसर्गिक आपत्ती घाटरस्त्यांच्या मुळावर

Published on

महाड, ता.२८ (बातमीदार) : पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या दरडी व भूस्खलनामुळे दक्षिण रायगडला अन्य जिल्ह्याने जोडणाऱ्या मुख्य चार घाटातील प्रवास वाहनचालकांसह नागरिकांसाठी धोक्याचा झाला आहे. महामार्ग विभाग तसेच बांधकाम विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करूनही दरडी व भूस्खलनामुळे घाटातील वाहतूकही वारंवार ठप्प होते. बुधवारी आंबेनळी घाटामध्ये कोसळलेल्या दरडीमुळे घाटातील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग तसेच अन्य प्रमुख राज्य व राष्ट्रीय मार्गांवर असणारे महत्त्वाचे कशेडी, ताम्हिणी, वरंध - वाघजाई व आंबेनळी घाट वर्षोनुवर्षे पावसाळ्यात धोकादायक ठरत आहेत. कोकणाला मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर तसेच पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याचे काम हे घाट करतात. त्यामुळे व्यापारी, प्रवासी तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतूक घाटातून होते. परंतु वाहनचालक व प्रवाशांना पावसाळ्यात मात्र जीव मुठीत धरून घाटातून प्रवास करावा लागतो. या चारही घाटातून दिवसरात्र वर्दळ सुरू असते. परंतु गेल्‍या काही वर्षांपासून हे घाट धोकादायक बनले आहेत.
कशेडी घाटातून कोकण व गोवा या भागात सतत वाहतूक सुरू असते. गणेशोत्सवात येथून विक्रमी वाहतूक होते. २००५ मध्ये घाटात दरड कोसळल्याने दहा दिवस वाहतूक ठप्प होती. घाटातील रस्ता खचत असल्याने महामार्ग विभागाला सतत लक्ष ठेवावे लागते. सध्या महामार्ग रुंदीकरणात घाटाला बोगद्याचा पर्याय निर्माण होत असला तरी त्याचे काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना कशेडी घाटातील अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
कोकणातून महाबळेश्वर, सातारा, वाई, कोल्हापूर या भागात आंबेनळी घाटातून मोठी वाहतूक सुरू असते. परंतु मंगळवारी रात्री तसेच बुधवारी घाटात दरड कोसळली. दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच वेळा दरड कोसळून घाटातील वाहतूक ठप्प होते. असाच प्रकार महाड-पुणे मार्गावरील वरंध-वाघजई घाटात घडतो. या घाटात सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. घाटातील समस्यांमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही गैरसोयींचा सामना करावा लागतो.


२०२१ मध्ये महाड व पुणे हद्दीत वरंध घाट परिसरात तब्बल २७ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यातच हा घाट अत्यंत अरूंद असल्याने दरड कोसळल्यानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. घाटामुळे माझेरी, पारमाची पुढे भोर हद्दीतील शिलीम कुंड, राजीवडी, हिरडोशी, साळुंगण, उंबर्डेवाडी, शिरगाव या गावातील ग्रामस्थाची मोठी गैरसोय होते. पुणे प्रवासाचे अंतर कमी असल्याने भाजी विक्रेते, खासगी बस, किरकोळ विक्रेते, पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. महामार्ग विभागाने घाटातील खड्डे दुरुस्ती तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी कामे केली आहेत, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारी यंत्रणेला देखील मर्यादा येतात.

महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन या मार्गावरील पुण्याकडे जाण्यासाठी उपयुक्त असलेल्या ताम्हिणी घाटातही दरडीचा धोका कायम आहे. हा घाट पर्यटकांना खुणावत असल्याने पावसाळ्यात या मार्गावर मोठी वर्दळ असते. कशेडी घाट वगळता अन्य घाटात तातडीने मदतकार्य पोहचणे अवघड जाते. शिवाय या घाटांना पर्यायी मार्ग नसल्याने दूरवरच्या मार्गाने वाहने वळवावी लागतात. यामुळे प्रवासी व वाहनचालकांना मनस्तापही सहन करावा लागतो.

घाटातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. पाणी वाहून जाण्यासाठी गटार खोदाई, नालेसफाई केली आहे. आपत्ती काळात मदत कार्यासाठी सर्व यंत्र सामुग्री घाटात सज्ज ठेवली आहे.
- अमोल महाडकर, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाड

महाड - वरंध घाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.