जागरूकतेअभावी तृतीयपंथी वॉर्ड रुग्णाविना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्य सरकारने जेजे ग्रुप समूह रुग्णालयाच्या गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात तृतीयपंथींच्या उपचारांसाठी विशेष वॉर्ड सुरू करण्यात आला आहे; पण जागरुकतेचा अभाव असल्याने हा वॉर्ड दोन महिने उलटल्यानंतरही रुग्णांविना सुना आहे. आतापर्यंत फक्त तीन तृतीयपंथी रुग्णांवर इथे उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे; तर तृतीयपंथी बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) १३ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. या वॉर्डसंदर्भात जनजागृती सुरू असून, त्यामुळे तृतीयपंथी रुग्ण वाढतील, असे रुग्णालय प्रशासनाची अपेक्षा आहे.
३ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने तृतीयपंथींच्या उपचारांसाठी जीटी रुग्णालयात एक समर्पित वॉर्ड सुरू केला होता. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ३० खाटांचा हा वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या वॉर्डात तृतीयपंथींच्या उपचारांसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी आणि डॉक्टरांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले. इतकेच नाही, तर येथे भरती झालेल्या
तृतीयपंथी रुग्णाशी कसे वागावे, याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
३ फेब्रुवारीपासून आजतागायत ओपीडीमध्ये तेरा रुग्णांनी उपचार घेतले. त्यात दोन डेंटल, पाच मेडिसीन, सर्जरीसाठी दोन; तर हाडांसाठी एकाने उपचार घेतले. फेब्रुवारी महिन्यात दोन, मार्च महिन्यात आठ, तर एप्रिल महिन्यात तीन जणांनी उपचार घेतले आहेत. तृतीयपंथी विभागात मात्र फेब्रुवारीपासून केवळ तिघांनी यात उपचार घेतले असून, एका तृतीयपंथी रुग्णावर मूळव्याधीसाठी, दुसरा रुग्ण ताप आणि तापासोबत अन्य आजारासाठी दाखल होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
-----
उपचारांसाठी प्रशासनाकडून सुविधा
ओपीडीमध्ये गेल्या दोन आठवड्यांत तीन तृतीयपंथी रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांना भरती करण्याची गरज नव्हती. केवळ वॉर्ड भरण्यासाठी नसून, त्यांच्यावर उपचारांसाठी प्रशासनाने ही सुविधा केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड सुरू करावा, अशी या समुदायाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. या उद्देशाने सरकारने हा वॉर्ड सुरू केला आहे. त्यांच्या समुदायाचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या वॉर्डबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे जीटी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर यांनी सांगितले.
.......
उपचार घेण्याचे प्रमाण कमी
पुण्याच्या ससून रुग्णालयात सुरू केलेल्या तृतीयपंथी कक्षातही आतापर्यंत एकही तृतीयपंथी उपचारांसाठी दाखल झालेला नाही. ओपीडीत तृतीयपंथी येतात; पण दाखल होऊन उपचार घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले.
..........
संस्थांसह जनजागृती
जीटी रुग्णालयात जास्तीत जास्त तृतीयपंथी उपचारांसाठी येण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने जवळपास सात तृतीयपंथींच्या सामाजिक संस्थासह ऑनलाईन बैठका घेतल्या आहेत. शिवाय, सातत्याने तृतीयपंथी समाजासाठी काम करणाऱ्या लोकांसोबत जनजागृतीपर उपक्रम राबवले जात असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.