मुंबई महानगरपालिका शाळांमधील शाळांची कामगिरी कौतुकास्पद
मुंबई, ता. ३१ : पुढच्या पिढीला बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. दर्जेदार शिक्षणाचे हे पवित्र काम मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून उत्तम प्रकारे सुरू आहे. यंदा पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी, शाळा तसेच शिक्षकांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांचा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज सन्मान करण्यात आला, त्या वेळी मंत्री केसरकर बोलत होते. दादर (पूर्व) येथील लोकमान्य टिळक कॉलनी परिसरातील योगी सभागृहात पार पडलेल्या या गुणगौरव सोहळ्यास शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी आदी उपस्थित होते.
शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून शासन काम करत आहे. आगामी वर्षात मुंबईतील सर्व शाळा अद्ययावत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. राज्य शासन राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरवर्षी सुमारे एक लाख ४२ हजार कोटी रुपये खर्च करते. त्यातील ६२ हजार कोटी रुपये केवळ शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात, यावरून या क्षेत्राचे महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. या वर्षी राज्यात सुमारे ५० हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन आहे. जगभरातील लोक भारताकडे आशेचे केंद्र म्हणून बघत आहेत. म्हणून येथील विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन प्रगती साधायला हवी, अशी भावनाही केसरकर यांनी या वेळी व्यक्त केली.
----------------
शाळा, विद्यार्थ्यांचा गौरव
महापालिकेच्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या ५९ विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, शब्दकोश, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. १०० टक्के निकाल असलेल्या ४१ शाळा; ९५ ते ९९ टक्के निकाल असलेल्या ३२ शाळा; ९० ते ९४.९९ टक्के निकाल असलेल्या ३८ शाळा; ८५ ते ८९.९९ टक्के निकाल असलेल्या ४४ शाळांच्या मुख्याध्यापकांचाही या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
---------------
२५ विद्यार्थ्यांचा पदवीपर्यंतचा खर्च पालिकेकडून
२५ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये पारितोषिक आणि त्यांच्या पदवी शिक्षणापर्यंतचा खर्चही मुंबई महानगरपालिका करणार आहे. पारितोषकाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. ९५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये; ९० ते ९४.९९ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.