पार्ले महोत्सव २०२३ मध्ये विविध स्पर्धांसाठी असंख्य स्पर्धक सहभागी
पार्ले महोत्सवात विविध स्पर्धांची मेजवानी
- २५ हजार पारितोषिकांचे करणार वितरण
मुंबई, ता. २५ : वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी पार्ले महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. विविध ३२ स्पर्धांमध्ये असंख्य स्पर्धक सहभागी झाले आहेत. ३९२ प्रथम पारितोषिके देण्यात येणार असून एकूण २५ हजार पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. तब्बल ८०० स्वयंसेवक पार्ले महोत्सवाच्या नियोजनासाठी कार्यरत आहेत.
वामन मंगेश दुभाषी मैदान, साठ्ये महाविद्यालय, पार्ले टिळक विद्यालय, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, उत्कर्ष मंडळ सभागृह, सहार गाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा सुरु आहेत.
सदृढ बालक स्पर्धेत सहा महिन्यांच्या सात्विक खातू, यशस्विनी सोनार, अरझान खान या बालकांनी बाजी मारली. ६ ते १२ महिन्यांच्या वयोगटात निशिता सिद्पुरा, प्रियांश राड्ये, प्रणशी श्रीकार यांनी पहिल्या तिघांमध्ये तर, तनीश व्होरा, विरा पाटेरे, आयर्व यादव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. १ ते २ वर्षे वयोगटात क्रिशिव नाईक, श्रेयाशी कदम, मान व्होरा यांना पहिली तीन तर, युविका पटेल, युवान पटेल, शिवम गौरव, आनार्य परमार, युवान चंदालिया, अथेना कांत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडू भविष्यात महाराष्ट्राचा, देशाचा लौकिक वाढवतील, असा विश्वास महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि आमदार पराग अळवणी यांनी व्यक्त केला.
मिलिंद शिंदे, श्रीकृष्ण आंबेकर, विनीत गोरे, विलास करमळकर, एन. सुरेशन, प्रवीर कपूर, राजीव मेहता, माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता, माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते महोत्सवात सहकार्य करत आहेत.
खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत
सदृढ बालक, कबड्डी, मल्लखांब, बुद्धीबळ, पिकल बॉल, फुटबॉल, सायकलिंग, व्हॉली बॉल, बॉक्स क्रिकेट, शरीरसौष्ठव, कॅरम, गायन, चित्रकला, हस्ताक्षर लेखन, मेहंदी, रांगोळी, आदी स्पर्धा आतापर्यंत पार पडल्या. विविध गटांमधील स्पर्धांची प्राथमिक फेरी झाली असून येत्या दोन दिवसांत त्यांच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांची लढत होईल. खेळांडूंमध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.