तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांना आता कडू गोळ्या घेण्याची गरज नाही. टाटा हॉस्पिटलने बंगळुरूच्या एका कंपनीच्या सहकार्याने मुलांसाठी गोड सिरप तयार केले आहे. या सिरपमुळे मुलांना आवश्यकतेनुसार औषधाचा अचूक डोस मिळेल आणि कडू औषधांपासूनही त्यांची सुटका होईल.
मुलांना गोळ्यांच्या स्वरूपात औषधे खायला देणे हे पालकांसाठी अनेकदा आव्हान असते. एक गोळी भरवताना खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकदा मुलांना उलट्या होतात. रक्त कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांनाही या समस्यांचा सामना करावा लागला. अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरईसी) हॉस्पिटलचे क्लिनिकल फार्माकोलॉजी विभागाचे प्रा. डॉ. विक्रम गोटा म्हणाले की, सर्व कर्करोगाने ग्रस्त मुलांना केमोथेरपी म्हणून गोळीच्या स्वरूपात ६ एमपी (मर्कपटोप्युरिन) औषध दिले जाते.