Mumbai Helth News: मुंबईकरांनो सावधान! टीबीचा विळखा होतोय घट्ट; आकडेवारी वाचून बसेल धक्का
Mumbai Helth News: शहरातून क्षयरोगाचे (टीबी) समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. तसेच या आजाराबाबत रुग्णशोध मोहीम आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. असे असले तरी मुंबई क्षयरोगाचे रुग्ण आजही मोठ्या संख्येने सापडत आहेत. (high number of tb paitents in mumbai)
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात तब्बल ६३ हजार ६४४ रुग्ण क्षयरोगाचे आढळले असून २,१४७ रुग्णांना क्षयरोगामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहराभोवती क्षयरोगाचा फास अधिक घट्ट होत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
मुंबई क्षयरोग मुक्तीसाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध स्तरावर उपक्रम राबवले जातात. २०२५ पर्यंत मुंबई क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले असले तरी मुंबईत क्षयरोगाच्या रुग्णांची वाढती नोंद धक्कादायक आहे.
मुंबईत क्षयरुग्णाचे प्रमाण कमी असले, तरी हा आजार प्रामुख्याने प्रौढांना होण्याचा धोका अधिक असतो. एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांना सक्रिय क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने एचआयव्हीग्रस्तामध्ये सक्रिय क्षयरोगाचा धोकाही जास्त असतो. तसेच कुपोषित व्यक्तीला क्षयरोग होण्याचा धोका तीन पट जास्त असतो, असे आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२३ ते आतापर्यंत तब्बल क्षयरोगाचे ६३ हजार ६४४ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी १० हजार ९१३ रुग्णांनी या आजारावर मात केली असून ते आता निरोगी आयुष्य जगत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. क्षयरुग्णाच्या उपचाराचे फलित म्हणजे उपचार सुरू झाल्यानंतर औषध संवेदनशील क्षयरुग्णांसाठी सहा महिन्यानंतर व फुप्फुसाचा क्षयरोग झाल्यास नऊ महिन्यानंतर तर औषध प्रतिरोधी क्षयरुग्णांसाठी दोन वर्षांनंतर औषध देण्यात येते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वर्षभरात पाच कर्मचाऱ्यांना लागण
क्षयरोगाच्या रुग्णांची विशेष काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आजाराची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकूण पाच कर्मचाऱ्यांना लागण झाली असून त्यापैकी पाचही कर्मचाऱ्यांनी या आजारावर मात केली आहे.
क्षयरोगावर प्रत्येक स्तरावर काम केले जात आहे. क्षयरोगाचे तपासणी, निदान आणि उपचार या सर्व गोष्टी आता वाढणार आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे. एखादा रुग्ण आढळला तर त्याचा अहवाल सहा महिन्यानंतर येतो. निक्षयवर नोंदणी झाली की ती अद्ययावत होईपर्यंत वेळ लागतो. असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.
- डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका
त्रिसूत्रीवर पालिकेचा भर
क्षयरोगाचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका तपासणी, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर देणार आहे. यामुळे संशयित रुग्ण वेळीच ओळखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्या रुग्णाच्या आरोग्यावर आजारामुळे अधिक परिणाम होण्यापूर्वी त्याच्यावर उपचार करणे शक्य होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आला.
निक्षय मित्रांचा सहभाग महत्त्वाचा
क्षयरोगग्रस्तांना पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा आजार बळावतो. ही परिस्थिती बदलावी, यासाठी सरकारकडून ‘निक्षय मित्र’ ही योजना राबवली जात आहे. यात निक्षय मित्र संबंधित क्षयरोग रुग्णाच्या पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी पार पाडतात. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येते. या योजनेमुळे रुग्णांना पोषण आहार मिळत असल्याने त्यांची प्रकृती सुधारण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.