Tourism Industry :पर्यटन व्यवसायात महिलांची संख्या वाढवण्यासाठी खास योजना, १५ लाखापर्यंत मिळेल कर्ज; कसं जाणून घ्या
मुंबई, ता. ३ : पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढवा, पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी, पर्यटन विभागाने ‘आई’ हे महिलाकेंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी नवी कर्ज योजना सुरू केली आहे. याचा लाभ पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
कर्ज योजना निवडीसाठी निकष असून पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा. पर्यटन व्यवसायामध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या आणि त्यांनी चालविलेल्या पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसायाकरिता मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा देण्यात येईल. या योजनेसाठी व्याजाची रक्कम १२ टक्क्यांच्या मर्यादेत त्यांच्या खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा सात वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४.५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल, तोपर्यंत व्याजाचा परतावा म्हणून देण्यात येणार आहे.
राज्यातील महिला पर्यटक उद्योजकांनी अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर अथवा मुख्यालय ०२२६९१०७६०० क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा पर्यटन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. कोकणसाठी ९१९६०४३२८०००, पुण्यासाठी ९१९४२३७ ७५५०४, नाशिकसाठी ९१९६८९९०८१११ , छत्रपती संभाजीनगरसाठी ९१८९९९०९७२५५, नागपूर आणि अमरावतीसाठी ९१८४२२८२२०५८ / ९१९२२६७७९७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पर्यटन संचालनालय, पर्यटन विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.