मृत्यूपत्र ठरतेय काळाची गरज
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : लहानपणी तोंडचा घास भावा-बहिणींसाठी काढून देणारी नाती आता मालमत्तेच्या वादात दुरावत चालली आहेत. विवाहानंतर विभक्त राहणाऱ्या अलिबागमधील एका मुलाने दारूच्या नशेत मालमत्तेच्या वादात मुलीकडे राहण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांनाच मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली. अशा प्रकारचे वाद दररोज पोलिस ठाण्यात येत असून भावा-बहिणींमध्ये समेट घडवून आणण्यात पोलिसांच्याही नाकीनऊ येत आहेत. हे वाद न्यायालयात गेल्यानंतर अनेक वर्षे मिटत नाहीत. एक एक इंच जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताचे नाते विसरले जाते. अशा प्रकारचे वाद भविष्यात होण्यापूर्वीच उपाय म्हणून ‘नोंदणीकृत मृत्युपत्र’ हा चांगला पर्याय असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
भावा-बहिणींमधील बहुतांश वाद मालमत्तेच्या हिश्श्यावरून होतात. पूर्वी ज्या जमिनी कवडीमोलाच्या होत्या त्या जमिनींच्या मोबदल्यात आता लाखो रुपये मिळू लागले आहेत. रायगडमध्ये येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी सध्या भूसंपादन सुरू आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये आपला सेकंड होम असावा, या उद्देशाने अनेक जण येथे जमिनी विकत घेतात. यामुळे येथील जमिनींना कधी नव्हे, तो भाव मिळू लागला आहे. यातून बहिणीने हिस्सा मागू नये म्हणून कागदोपत्री बहिणीला मयत दाखवण्याचेही प्रकार समोर येत आहेत. मामा-भाच्यांचे वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना रायगडमध्ये घडल्या आहेत.
मालमत्तेच्या वादावरून न्याय निवाडा करत बसण्यापेक्षा अनेक पालक आता मृत्युपत्र करून ते रजिस्टर (विल) करू लागले आहेत. ज्यात आपल्या मृत्यूनंतर संपत्तीचे काय केले जावे, याबद्दलची इच्छा व्यक्त केली जाते. मृत्यूनंतर आपल्या सर्व मालमत्तेची वाटणी कशा पद्धतीने व्हावी, याचे ते कायदेशीर कागदपत्र असते. त्यात आपण स्वत: कमावलेल्या संपत्तीतून एखाद्या नातेसंबंधातील तथा कुटुंबातील व्यक्तीला बेदखलही करू शकतो. तसेच कुटुंबातील कोणाला किती वाटा द्यायचा, हे ठरवता येते.
मृत्युपत्र कोण करू शकतो?
- मृत्युपत्र लिहिताना मानसिक संतुलन ठीक असणे आवश्यक आहे. सज्ञान असलेली प्रत्येक व्यक्ती मृत्यूनंतर आपल्या संपत्तीची विल्हेवाट किंवा वाटप कोठे आणि कसे करावे, हे कोणाच्याही दबावात न येता ठरवू शकते.
- अनेक वेळा आई-वडिलांच्या निधनानंतर भावा-बहिणींमधील वाद विकोपाला जातात. त्यामुळे हे मृत्युपत्र निबंधक कार्यालयात शासकीय नोंदणी फी भरून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
- मृत्युपत्र तयार करणे बंधनकारक नाही, पण मृत्यूनंतर आपल्या संपत्तीवरून घरातील सदस्य किंवा नातलगांमध्ये वादविवाद, भांडण-तंटे आणि गैरसमज निर्माण होऊन नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून मृत्युपत्र करता येते.
- संपत्तीत कमी-जास्त हिस्सा मिळाला म्हणून बालपणी एकमेकांसोबत वाढलेले सख्खे भाऊ-बहीण एकमेकांच्या जिवावर उठतात. म्हणून पालकांनी हयातीतच कायदेशीर रजिस्टर मृत्युपत्र तयार करणे गरजेचे असते.
- मृत्युपत्र तयार केल्याने मृत्यूनंतर कुटुंबीयांना आपल्या संपत्तीची समान वाटणी करत बसण्यात, कायदेशीर कारवाई करण्यात वेळ वाया घालवावा लागत नाही.
मृत्युपत्रातील महत्त्वाचे मुद्दे
- मृत्युपत्र स्वेच्छेने बनवत असून त्यासाठी कोणाचाही दबाव नाही, हे स्पष्टपणे नमूद करावे. मृत्युपत्राची भाषा सुस्पष्ट आणि समजेल अशी असावी.
- मृत्युपत्र तयार करताना आपली मानसिक स्थिती ठीक होती, हे सिद्ध करणाऱ्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेणे योग्य ठरते.
- मृत्युपत्रात आपण काय लिहिले, हे वारसदारांना सांगू नका; अन्यथा आपल्या जिवंतपणीच त्यांच्यात संपत्तीवरून वादविवाद होतील.
- मृत्युपत्राची कायदेशीर नोंदणी करून घेणे आवश्यक, भविष्यात ते चोरी होणे, हरवले तरी निबंधक कार्यालयातून दुसरी प्रत मिळते.
- कायदेशीर नोंदणी करून तयार केलेले मृत्युपत्र बनावट किंवा खोटे असल्याचा दावा कोणी करू शकणार नाही.
- मुत्युपत्र तयार करताना दोन साक्षीदार असावेत. ज्याने आपले मृत्युपत्र तयार केले, त्याच्या स्वाक्षरीसोबतच साक्षीदारांच्या सह्या घ्याव्यात.
मालमत्ता हस्तांतर कायद्याअंतर्गत गहाणखत, खरेदीखत, बक्षीसपत्र व मृत्युपत्र करून स्वत:ची मालमत्ता संबंधित व्यक्ती तिच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकते. मृत्युपत्र हे संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतरच अस्तित्वात येते. न्यायालयातून, उपनिबंधक कार्यालयातून किंवा साध्या कागदावरही ते करता येते. नोंदणीकृत मृत्युपत्राला कायदेशीर दर्जा राहत असल्याने नोंदणी केलेली उत्तम.
- अॅड. भूषण साळवी, सरकारी वकील, जिल्हा न्यायालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.