मृत झाडांपासून विटांसह सेंद्रिय खताची निर्मिती

मृत झाडांपासून विटांसह सेंद्रिय खताची निर्मिती
Published on

भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : मृत झालेल्या झाडांपासून तसेच छाटणी केलेल्या झाडांच्या फांद्या व पालापाचोळा यापासून ठोकळे व सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प मिरा भाईंदर महापालिकेने सुरु केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. या प्रकल्पाचे आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.
उद्यानामधून तसेच रस्त्याच्या बाजूला लावलेल्या झाडांच्या तुटलेल्या फांद्या, मृत झालेली तसेच उन्मळून पडलेली झाडे, वनविभागाकडून वेळोवेळी करण्यात येत असलेली झाडांची छाटणीमुळे निर्माण होणारा पालापाचोळा यांचा काहीच उपयोग न होता ती वाया जातात. मात्र ही संपत्ती वाया जाऊ न देता त्यांचा सदुपयोग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार झाडांच्या फांद्या व खोडांपासून ठोकळे (विटा) तसेच पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचे काम घोडबंदर येथील बस डेपो लगत सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून तो कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्प उद्‌घाटनाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, शहर अभियंता दीपक खांबित आदी उपस्थित होते.
या प्रकल्पासोबतच मिरा रोड येथील इंद्रलोक परिसरात माझी वसुंधरा अभियान व ‘वनमहोत्सव २०२३’ अंतर्गत मेकिंग द डिफरन्स या संस्थेमार्फत मियावाकी संकल्पनेतून १०५०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगाने वाढणारे शहरी जंगल अशी मियावाकी ची ओळख आहे. या उद्यानाचेही लोकार्पण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

प्रकल्पासाठी एक कोटीचा खर्च
प्रकल्पात येणाऱ्‍या झाडाच्या फांद्या आणि खोडे स्वतंत्र करून त्याचे यंत्राच्या साहाय्याने लहान तुकडे केले जाणार आहेत. त्यानंतर त्याची भुकटी तयार करून उच्च दाबाखाली त्यापासून ठोकळे म्हणजेच विटा तयार केल्या जाणार आहेत. या विटा पर्यावरणपूरक असल्याने त्याचा प्रदूषण न करणारे जळाऊ इंधन म्हणून सहज वापर करता येणार आहे. तसेच झाडांच्या पालापाचोळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एक कोटी रुपये खर्च आला आहे. अशा पद्धतीने प्रकल्प उभारणारी मिरा भाईंदर ही मुंबई महानगर क्षेत्रात पहिलीच महापालिका ठरली आहे, असे आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.