कॅन्सर मुक्त महिलांचा गौरव!
कॅन्सरमुक्त महिलांचे वेळीच सक्षमीकरण काळाजी गरज ः अब्दुल खादर
‘तनिष्का’ अभियानांतर्गत कर्करोगातून मुक्त झालेल्या स्त्रियांचा गौरव
चेंबूर, ता. १८ (बातमीदार) ः कॅन्सरमुक्त महिलांचे वेळीच सक्षमीकरण होणे काळाजी गरज आहे. इंडियन कॅन्सर सोसायटी त्यांचे सक्षमीकरण करण्याकरिता प्रयत्न करीत आहे. दानशूर व्यक्ती पुढे आल्या तर नक्कीच त्यांच्या हाताला बळ मिळेल, असे प्रतिपादन इंडियन कॅन्सर सोसायटीचे उपमहासंचालक (संचालन आणि प्रशासन) कर्नल अब्दुल खादर यांनी केले. ‘सकाळ’ माध्यमसमूहाच्या ‘तनिष्क’ स्त्री प्रतिष्ठा अभियानांतर्गत शिवडीतील इंडियन कॅन्सर सोसायटीत महिला दिनाच्या निमित्ताने कर्करोगातून मुक्त झालेल्या स्त्रियांचा नुकताच गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी चार हात करून महिला आता आपले जीवन जगत आहेत. कर्करोगावर उपचार करण्याकरिता शिवणकाम आणि रोजंदारीतून मिळणारी कामे करीत जमा होणाऱ्या पैशांनी औषधाचा खर्च उचलत आहेत. त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लक्ष्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा व नावीन्याज् हॅण्डलूम पैठणी स्टुडिओच्या संचालिका सोनाली घाटे बाणे यांनी सांगितले. ‘तनिष्का’च्या मुंबई मुख्य व्यवस्थापक प्रथमा शिरोडकर यांनी महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना आत्मविश्वास व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तनिष्का व्यासपीठातर्फे केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली.
‘प्रत्येक महिलेने पौष्टिक आहारावर भर द्यावा. वेळेवर आहार घेऊन हळूहळू वजन वाढवण्याकडे लक्ष द्यावे. महिला आपल्या परिवाराकडे जास्त लक्ष देतात. त्यांनी प्रथम स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपण सक्षम म्हणजे परिवार सक्षम असेल,’ असा सल्ला उपव्यवस्थापक वीणा परब यांनी कॅन्सरमुक्त महिलांना दिला. इंडियन कॅन्सर सोसायटीचे उपसंचालक (सर्व्हायव्हरशिप आणि रिहॅबिलिटेशन) भैरवी गावडे आणि वरिष्ठ व्यवस्थापक प्रशासन डॉ. महेश शिर्के यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कर्करोगाशी झुंज देताना इंडियन कॅन्सर सोसायटीने केलेल्या सहकार्याबद्दल कॅन्सरमुक्त सुमन सूर्यवंशी, शोभना यादव, वैशाली सामंत, छाया वादट व प्रमिता कुंभार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात कॅन्सरमुक्त सुमन सूर्यवंशी यांनी ‘वादळवारं सुटलं ग’ गाण्यावर नृत्य करीत उपस्थितांची मने जिकली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डेप्युटी डायरेक्टर प्रीतम सावंत व कर्मचारी, तनिष्का व्यासपीठाच्या भांडुपमधील गटप्रमुख रेणुका साळुंखे आणि घाटकोपरमधील गटप्रमुख पद्मा मळवळकर यांनी मेहनत घेतली.
कॅन्सरमुक्त महिलांची सोसायटीप्रती कृतज्ञता
मला कर्करोगाची लागण झाली तेव्हा कित्येक महिने त्याची कल्पना नव्हती. मी बरी होईन का? खर्च परवडेल का, असे प्रश्न मला पडले होते. महिलांकडे प्रगती व सहन करण्याची मोठी ताकद आहे. मला कॅन्सर सोसायटीत प्रेरणा मिळाली. हाताला काम मिळाले, अशी प्रतिक्रिया प्रमिता कुंभार यांनी दिली. ‘कर्करोग झाला तेव्हा मी वाचेन की नाही याच्याच विचारात असायचे. खूप ठिकाणी जाऊन उपचार केले. शेवटी आम्ही टाटा रुग्णालयात आलो. आता कर्करोगाला तोंड देऊन स्वतःच्या पायावर उभी आहे,’ अशी भावना शोभना यादव यांनी व्यक्त केली. वैशाली सामंत म्हणाल्या, की २०१८ मध्ये मला कॅन्सर झाला. जवळ नातेवाईक नव्हते. घर नव्हते. इंडियन कॅन्सर सोसायटीची मदत मिळाली. आज नातेवाईकांपेक्षा इंडियन कॅन्सर सोसायटी जवळ व आपलीशी वाटत आहे. ‘कर्करोगाला मी हसत हसत लढा दिला. स्वतःचे ड्रेसिंग स्वतः केले. कोणीही मदतीला नव्हते. हसत हसत जगले,’ अशी प्रतिक्रिया छाया वादट यांनी दिली.
विजेत्या महिलेला पैठणी
कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक महिलांना प्रमुख पाहुण्या सोनाली घाटे बाणे आणि मान्यवरांच्या हस्ते नथ देण्यात आली. लकी ड्रॉमधील विजेत्या महिलेला पैठणी देऊन गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.