Drugs Smuggling : वसई-विरार शहराला ड्र्रग तस्कारांचा विळखा
वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यात गांजा, चरस, कोकेन, एमडी, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांचे प्रमाण अधिक आहे.
वसई - पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात अमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यात अनेकदा परदेशी नागरिकांचादेखील सहभाग असल्याचे समोर आले आहे. ही अमली पदर्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांचे मिशन यशस्वी होत असून गेल्या वर्षभरात एकूण ८२५ गुन्हे दाखल झाले असून ६४३ जणांना अटक करण्यात आली आहे. या अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये परदेशी नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे; तर पोलिसांनी मार्च महिन्यात एक कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यात गांजा, चरस, कोकेन, एमडी, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. मोक्याची ठिकाणे शोधून या पदार्थांची विक्री केली जाते. एकदा या अमली पदार्थांचे व्यसन लागले की अमली पदार्थ मिळविण्यासाठी तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. तसेच नियमित कारवाई करण्यासाठी सतत बैठक घेण्यात येत आहेत. मिरारोड, काशिमिरा, उत्तन, नवघर, भाईंदर, नया नगर, वसई, माणिकपूर, विरार, वालीव, तुळिंज, आचोळे, पेल्हार, अर्नाळा, मांडवी, नालासोपारा अशा एकूण १६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तांच्या सूचना
बंद पडलेल्या कंपन्या, गोडावून, कारखाने आदी ठिकाणी पोलिस पथकाने नियमित तपासणी करावी. तसेच शेजारील राज्यातून अमली पदार्थ आपल्या शहरात येणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
२०२१ - विक्रेते - १०५ सेवन करणारे - ४०८
२०२२ - विक्रेत ११७, सेवन करणारे ५४८
व्यसनाधीनतेत तरुणाई गुरफटत चालली आहे. पोलिसांकडून योग्य कारवाई होत आहे; परंतु कुठेतरी पालक-मुलांचा संवाद कमी होत आहे, ज्यामुळे मुले संकटात पडतात. मुलांना समजून घेणारा, समजावून सांगणारा व्यक्ती हवी असते. त्यामुळे पालक-मुलांनी एकमेकांसाठी विशेष वेळ काढून मनमोकळे संवाद साधणे काळाची गरज बनली आहे.
- अमित पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वदा प्रतिष्ठान
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिल्या. पोलिस आयुक्तालयाच्या जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली यात अन्न व औषध प्रशासन, सीमाशुल्क विभाग, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग सहभागी झाले होते.
एमडीचे प्रमाण अधिक
मार्च महिन्यातील २० दिवसांत नालासोपारा, वसई, मिरा रोड परिसरातून कोट्यवधी रुपयांचे कोकिन, ब्राऊन शुगर, चरस, एमडी जप्त करण्यात आले आहे. तस्करी करणाऱ्यांत नायजेरियन नागरिक व एका महिलेचादेखील समावेश असल्याचे समोर आहे. मार्च महिन्यात एक कोटी ३४ लाख २६ हजार ४०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात एमडीचे प्रमाण अधिक आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चालू वर्षात अमली पदार्थ विक्री व करणाऱ्यांवर कारवाईच्या संख्येत वाढ झाली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये देशाबाहेरील व्यक्तींचादेखील समावेश आहे. तसेच आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेजारी राज्यातून अंमली पदार्थ शहरात येणार नाहीत यासाठीदेखील लक्ष दिले जात आहे.
- विशाल धायगुडे, जनसंपर्क अधिकारी, पोलिस आयुक्तालय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.